Thu, Feb 27, 2020 23:46होमपेज › Kolhapur › खंडणी मागणार्‍या कॉन्स्टेबलची बदली

खंडणी मागणार्‍या कॉन्स्टेबलची बदली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इचलकरंजी : वार्ताहर

कोणताही गुन्हा नसताना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन यंत्रमाग कामगाराकडून खंडणी मागणार्‍या शहापुरातील कॉन्स्टेबल पांडुरंग जाधवर यांची रविवारी उचलबांगडी करण्यात आली. तडकाफडकी त्यांची बदली करून मुख्यालयाकडे रवानगी करण्यात आली. मोबाईलवरून खंडणी मागण्याच्या प्रकारामुळे शहापूर पोलिस ठाणे पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडले असून या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याची चर्चा आहे. 

महिन्यापूर्वी राहुल सुरवसे या यंत्रमाग कामगाराचा आर्थिक देवघेवीतून त्याच्या मित्रानेच खून केला. हा प्रकरणातील मुख्य संशयित अंकुश ऊर्फ अनिकेत अरुण चव्हाण (रा. खोतवाडी)  सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मृत सुरवसे याच्याशी संबंधित आणखीन एक कामगार सोलापूर परिसरात सध्या राहण्यास आहे. याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन हजारो रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार एका पोलिसाकडून घडला. 

जाधवर याने यंत्रमाग कामगाराकडे  खंडणी मागितल्याचे मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे संभाषण शहापूर पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल जाधवर व खोतवाडी येथील एका व्यक्‍तीमध्ये झाले आहे. हे संभाषण वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या हाती लागले असून, गोपनीय चौकशी सुरू केली आहे. जर पैसे एकदम देण्यास जमत नसेल तर थोडे थोडे करून दे, असेही संभाषणात म्हटले आहे. सुमारे वीस मिनिटांचे हे संभाषण आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या नावाचाही वापर करीत खंडणी मागितल्याचा संभाषणात समावेश आहे.