Sat, Jul 11, 2020 19:22होमपेज › Kolhapur › राजकीय नेते, संघटना संशयाच्या भोवर्‍यात!

राजकीय नेते, संघटना संशयाच्या भोवर्‍यात!

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:40PMकोल्हापूर : सुनील कदम

राधानगरी तालुक्यातील बॉक्साइटसारख्या बहुमोल खनिजाची एकप्रकारे लूट सुरू आहे. अभयारण्य परिसरातील पर्यावरणावर अक्षरश: नांगर फिरवला जात आहे. तरीही एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता बहुतांश राजकीय पक्ष, संघटना अथवा  राजकीय नेते याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या मंडळींचेही हात यामध्ये बरबटलेले आहेत की काय, तेही हिंडाल्कोच्या या बॉक्साईट मलिद्यात भागिदार बनलेत की काय, अशी शंका आता जिल्ह्यातील जनता खुलेआमपणे व्यक्त करताना दिसत आहे. 

साधारणत: पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील या बॉक्साइट खोदाईला सुरूवात झाली. सुरूवातीच्या काळात यातून मिळणार्‍या ‘मलिद्याकडे’ कुणाचे लक्ष गेले नाही, पण हळूहळू यातील मलिदा अनेकांच्या नजरेत भरू लागला आणि काहीजण या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी पुढे सरसावले. साहजिकच त्यामध्ये अग्रक्रम होता तो काही राजकीय नेतेमंडळी आणि काही तथाकथीत बाजारू नेत्यांचा. सुरूवातीच्या काळात या बॉक्साइटमधून मिळणार्‍या कमाईतील काही कमाई मिळवण्यापुरती त्यांची धाव मर्यादीत होती, पण या धंद्यातील खरी कमाई बघितल्यावर अनेकांचे डोळे पांढरे झाले आणि मूठभर वाटणीपेक्षा अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या धंद्यात बरोबरीचे भागिदार होण्यातच  धन्यता मानलेली दिसते. राधानगरीतून जी बॉक्साईट वाहतूक चालते, त्या वाहतूक ठेकेदारांच्या यादीवर जरी नजर टाकली किंवा बॉक्साईट वाहतूक करणार्‍या वाहनांच्या मूळ मालकांची चौकशी केली  तरी हिंडाल्को कंपनीसह आणखी कोण कोण मंडळी या ‘बॉक्साईट घबाडाचे लाभार्थी’ आहेत ते चव्हाट्यावर येईल. केवळ कागदोपत्री असलेले हे वाहतूकदार कोणकोणत्या राजकीय पक्षाशी संबंधीत आहेत आणि कोण कोणत्या राजकीय नेत्यांशी राजकीय लागेबांधे ठेवून आहे, तेही समजून आल्याशिवाय राहणार नाही.

राधानगरीतून आज बॉक्साइटची वाहतूक करणारे बहुतेक सगळे ट्रक हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे, त्यांच्या नातेवाइकांचे, कार्यकर्त्यांचे अथवा आप्तस्वकीयांच्या मालकीचे असल्याचा बोलबाला आहे.  या माध्यमातून या मंडळींना कायमस्वरूपी कमाईचे साधन मिळवले असल्याचाही काहीजणांचा आरोप आहे. त्यामुळे तर बॉक्साइटच्या खोदाईमुळे राधानगरी अभयारण्यातील पठाराची वाट लागत असतानाही ही मंडळी निवांत असावीत, असा संशय घेण्यास पुष्कळ वाव आहे. काही शासकीय अधिकार्‍यांच्या मित्रमंडळींचे आणि नातलगांचे ट्रकही या वाहतूक व्यवसायामध्ये गुंतविण्यात आल्याचे समजते.  हे खरे असेल तर अशा राजकीय कार्यकर्त्यांकडून आणि अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारच्या कारवाईची अपेक्षा करण्यातच अर्थ नाही. त्यामुळे आता थेट जनतेनेच या प्रकरणी उठाव करण्याची गरज आहे.
 

आता उठवू सारे रान!

मध्यंतरी काही निसर्गप्रमी मंडळींनी या बॉक्साइट खोदाईविरूध्द आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुणाचीही साथ न मिळाल्याने त्यांचा आवाज हवेतच विरून गेला. मात्र आता डोक्यावरून पाणी जाण्याची वेळ आलेली आहे. राधानगरी अभयारण्य परिसरातील ही बॉक्साईट खोदाई आणि वाहतूक उपलब्ध असलेल्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करून जर वेळीच रोखली गेली नाहीतर आज पर्यावरणाचा जागतिक वारसा असलेले राधानगरी अभयारण्य जैव विविधतेअभावी ओसाड पडलेले बघायला मिळण्याचा धोका आहे. हे टाळायचे असेल तर ‘आता उठवू सारे रान’ या भूमिकेतून सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे.