माजी खासदार धनंजय महाडिक
विठ्ठल परिवाराचे आधारवड असणारे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक पैलवान भारतनाना भालके यांच काल निधन झालं. मनाला चटका लावणारा हा क्षण होता. त्यांचा स्वभाव अत्यंत समाजसेवी होता. त्यांची एक शैली होती गावरान. शेतकऱ्यांच्या हाकेला ते नेहमी धावून जायचे. असं हे नेतृत्व होत.
त्यांच्या अचानक जाण्याने भीमा आणि विठ्ठल परिवारामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अनेक प्रसंग आहेत त्यांचे आमच्या सोबतचे कारण आमच दृढ नात होत त्यांच्याशी. मी कोल्हापुरमध्ये असल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात फार नव्हतो, पण भीमा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला वसंतदादा काळेंनी मला निवडणूक लढवायला लावली. त्यावेळी आमचा थोड्या मतांनी पराभव झाला. पण नंतरच्या कालावधीमध्ये भारतनाना व कल्याणराव या मंडळींनी निवडणूक लढवण्यासाठी मोठी ताकद दिली. त्यामुळे आपण निवडणूक जिंकू शकलो.
सध्याची कारखानदारांची परिस्थीती बघितली तर साखर उद्योग वेगवेगळ्या अडचणींमधून मार्ग काढत आहे. अशा परिस्थीतीत एक डेडलॉक तयार झाला होता. यावर्षी कारखाने सुरु होतील का नाही अस वाटत होत. कारण गेली दोन तीन वर्ष दुष्काळ असल्यामुळे आणि गेल्यावर्षी कारखाने बंद असल्यामुळं कारखान्यांना आर्थिक सहाय्य करणं, एफआरपी देणं, यांची खूप मोठी अडचण तयार झाली होती. या सगळ्या प्रक्रियेत शासन सकारात्मक असताना भारतनाना भालकेंनी या सगळ्यात पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादांकडे असेल शरद पवार साहेबांकडे असेल खूप पाठपुरावा केला.
या सगळ्या अडचणींतून मार्ग काढून हे सगळे कारखाने चालू करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आता विठ्ठल कारखानासुध्दा सुरु झाला आहे. राज्यकर्त्यांकडे जाण असेल, पाठपुरावा करण असेल, आपली भूमिका समजावून सांगने असेल, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मांडण असेल. या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रभावीपणे केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जाण्याने खूप मोठा आधार गेलेला आहे. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा. यासाठी भिमा परिवार त्यांच्या पाठिशी आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली मी भिमा परिवारातर्फ वाहतो.
शब्दांकन - संतोष कनमुसे