कोल्हापूर : प्रवीण मस्के
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) अधिछात्रवृत्तीसाठी विद्यापीठाच्या ‘एनआयआरएफ’ रँकिंगचा निकष लावल्याने अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. या निकषामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
‘बार्टी’च्या वतीने विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी फेलोशिप दिली जाते. 2013 मध्ये बार्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (बीएएनआरएफ) सुरू केली. ‘बीएएनआरएफ’ 2019 ची जाहिरात व मार्गदर्शक सूचना ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ—ेमवर्कने (एनआयआरएफ) 2019 करिता जाहीर केलेल्या पहिल्या शंभर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असा नवीन निकष लावण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणीचे ठरत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातून सुमारे 200 हून अधिक विद्यार्थी यासाठी अर्ज करतात. 2019 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2021 मध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्यापीठ रँकिंगचा निकष लावला गेला आहे.
ज्या विद्यापीठांची नावे पहिल्या शंभरमध्ये नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे, हा प्रश्न आहे. अधिछात्रवृत्तीसाठी जागा वाढविण्याबरोबर विद्यापीठ रँकिंगऐवजी विद्यार्थी गुणवत्तेचा निकष लावण्यात यावा, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
नवीन विद्यापीठ निकषाबाबत ‘बार्टी’शी पत्रव्यवहार केला आहे. यासंदर्भात त्यांनी उत्तर पाठविले आहे. नियामक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु नियामक मंडळाची बैठक झालेली नाही. अन्यायकारक निकषाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. विद्यापीठ रँकिंगऐवजी विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता पाहावी.
- योगेश चितारे, विद्यार्थी