Sat, Feb 29, 2020 17:46होमपेज › Kolhapur › ...अन्यथा मनपाला वाहनांचा बेमुदत घेराव

...अन्यथा मनपाला वाहनांचा बेमुदत घेराव

Last Updated: Dec 21 2019 12:05AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरातील सर्व प्रमुख रस्ते खराब झाल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे महापालिकेवर रिक्षांसह मोर्चा काढण्यात आला. खड्डेमय रस्ते तत्काळ नवीन न केल्यास महापालिकेस वाहनांसह बेमुदत घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. मोर्चामुळे शिवाजी चौक ते सीपीआर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महासंघातर्फे दोन महिन्यांपासून रस्त्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दसरा चौक ते महापालिका मोर्चा काढण्यात आला. यावेळी वाहनधारकांनी महापालिका प्रशासन व अधिकार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. रिक्षांवर ‘कोल्हापूर की खड्डेपूर?’ असे लक्ष्यवेधी फलक लावण्यात आले होते. महासंघाच्या वतीने महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते यांना निवेदन देण्यात आले. 

महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका अधिकार्‍यांच्या कारभाराचे वाभाडे काढत त्यांचा निषेध केला. शहरातील खराब रस्ते सोडून अधिकारी चांगले रस्ते दुरुस्त करीत आहेत. यात अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे सुरू असून त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहार तपासण्याची मागणी महापौरांकडे केली. 

नागरिकांना चांगल्या सुविधा देणे व रस्ते चांगले करणे हा अजेंडा ठेवला आहे. तीन आमदारांच्या निधीतून 75 लाख रुपये व मुख्यमंत्र्यांनी 178 कोटी रुपयांच्या रस्ते कामासाठी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. शहरातील रस्ते चांगले करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही महापौर अ‍ॅड. लाटकर यांनी महासंघाच्या पदाधिकार्‍यांना दिली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, नीलेश हंकारे, अमित भोसले, सयाजी आळवेकर आदी उपस्थित होते.   

काय आहेत प्रमुख मागण्या?  

शहरातील रस्ते नवीन करावेत

रस्त्यांवरील खड्डे त्वरित भरावेत

आयआरबीच्या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती करावी