Mon, Sep 21, 2020 18:06होमपेज › Kolhapur › मानवनिर्मित मृत्यूचा नवा सापळा?

मानवनिर्मित मृत्यूचा नवा सापळा?

Published On: Jul 10 2019 1:39AM | Last Updated: Jul 10 2019 1:39AM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूंत रस्त्यांतील खड्ड्यांनी नागरिकांचे कंबरडे मोडल्यानंतर आता कोल्हापूरकरांसाठी नवा मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. महापालिकेने आणि जिल्ह्यातील एकूणच लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे खड्ड्यांची संख्या तर वाढत गेलीच; पण पावसाळ्यातील पाण्याच्या योग्य निचर्‍याची व्यवस्था न केल्यामुळे आज खड्ड्यांत पाणी साचून हे खड्डे अपघातांना मोठे आमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यातच भटक्या कुत्र्यांनी रस्त्यांवर उच्छाद मांडल्याने नागरिकांच्या डोक्यांवर दुचाकींवरून जातानाही मोठ्या अपघाताची टांगती तलवार कायम आहे. 

संपूर्ण राज्यात कोल्हापुरात पडणारा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो. कोकणात आणि विदर्भातील रस्ते पावसाळ्यात दररोज अतिवृष्टी अनुभवत असतात; पण तेथील रस्त्यांचे आयुर्मान किमान पाच वर्षे असले, तरी कोल्हापुरातील रस्ते मात्र ‘युज अँड थ्रो’ पद्धतीप्रमाणे अवघे वर्षभरही टिकत नाहीत, असा काही दशकांचा अनुभव आहे. मग यामध्ये बर्‍याच वेळेला रस्त्यांचा दर्जा जसा अवलंबून असतो, तसे महापालिकेच्या विविध विभागांतील असलेला समन्वयाचा अभाव व त्यातून होणारी रस्त्यांची खुदाई आणि सांडपाण्याच्या निचर्‍याकडे होणारे दुर्लक्ष, अशी आणखी काही कारणेही या रस्त्यांच्या घटत्या आयुर्मानाला जबाबदार धरली जातात. यातून रस्त्यांच्या खड्ड्यांची मालिका सुरू होते. गेली काही वर्षे तर कोल्हापुरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते आहेत, असा कुणालाही सहज प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. 

या रस्त्यांनी तालमींसाठी, मजबूत शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या  कोल्हापूरकरांचे सर्व अवयव जणू खिळखिळे करण्याचा विडाच उचलला आहे की काय, अशी परिस्थिती आहे. या खड्ड्यांनी अनेकांचे मानगूट, तर बहुतेकांची कंबर पकडली आहे. हे दुखणे साधारण साठीनंतर माणसाच्या जीवनात येते; पण अलीकडे या दुखण्याने वीस ते तीस वयोगटातील 
तरुणांना आपली लिलया शिकार बनवली आहे. जनतेला अस्थिरोगाचे बक्षीस देणारे हे रस्त्यांवरील खड्डे बुजवून करदात्यांना आर्थिक नसेना पण किमान शारिरीक दिलासा देण्याची अपेक्षा महापालिकेकडून होती पण त्यांनी ती पार पाडली नाही. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर पाण्याने भरलेले हेच खड्डे अंदाज न आल्याने नागरिकांच्या जीवाभोवती मृत्यूचा सापळा तयार करण्याची भूमिका बजावू लागले आहेत.

कोण करणार या रस्त्यांची दुरुस्ती? लोकप्रतिनिधींकडे आता फॉर्च्युनर गाड्या आल्याने त्यांना धक्के बसत नाहीत आणि जिल्ह्याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते असूनही रस्त्यांसाठी कोल्हापूर हा एक आदर्श जिल्हा करावा असे मंत्र्यांनाही वाटत नाही. यामध्ये नित्यनियमाने मालमत्तेच्या जप्तीच्या भीतीने वेळेत कर भरणार्‍या सामान्य नागरिकांची मात्र ससेहोलपट सुरू आहे. या खड्ड्यांना आता महापालिकेच्या सांडपाणी निर्गत करण्याच्या व्यवस्थेचा उडालेल्या बोजवार्‍याने मोठी मदत केली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात पावसात एक फेरफटका मारली याची सहज कल्पना येऊ शकते. कोल्हापूर शहरात तर राजारामपुरी, शिवाजी उद्यमनगर, जरगनगर, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अशी अनेक ठिकाणे सांगता येतील. जेथे आज श्‍वास मुठीत घेऊन नागरिकांना आपले दुचाकी वाहन चालवावे लागते आहे. या सर्वांमध्ये कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांची मोठी भर पडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची जबाबदारी महापालिकेची आहे. यावर नेहमी चर्चा होते पण कृती होत नाही आणि कुत्री मात्र गल्लोगल्ली पिल्लांची रास उभी करताना दिसते आहे. अशी कुत्री नेमकी दुचाकी स्वारांच्या आडवी येतात आणि भांबावलेला दुचाकीस्वार अपघाताच्या सापळ्यामध्ये अलगत पकडला जातो. 

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना रस्त्यांवरुन सुरक्षितपणे प्रवास करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण ही सुरक्षितताच मुळी गेली काही वर्षे गमावून बसली आहे. ती परत मिळविण्यासाठी हक्क म्हणून नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. अन्यथा या मृत्यूच्या नव्या सापळ्यात निष्पापांचे बळी जाण्याचाच धोका अधिक आहे.