Wed, Sep 23, 2020 21:55होमपेज › Kolhapur › सातारा-कागल सहापदरी महामार्गाचा खेळखंडोबा!

सातारा-कागल सहापदरी महामार्गाचा खेळखंडोबा!

Published On: Sep 25 2018 1:39AM | Last Updated: Sep 25 2018 1:19AMकोल्हापूर : सुनील कदम

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडण्याकामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सातारा ते कागलदरम्यानचे सहापदरीकरणाचे काम गेल्या चौदा वर्षांपासून रखडत पडले आहे. केवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वेळकाढूपणामुळे या कामाचा खेळखंडोबा सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणाअभावी आजपर्यंत या मार्गावर अनेकांचा प्राण गमावूनसुद्धा, अजून संबंधितांना जाग आलेली दिसत नाही. रस्ते विकास महामंडळाच्या या दिरंगाईबद्दल आता वाहनधारक आणि सर्वसामान्य लोकांमधूनच उठाव होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

स्व. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या देशातील सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पांतर्गत मुंबई-बेंगलोर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2005 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीचा प्रचंड ताण विचारात घेऊन या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार या महामार्गाच्या मुंबई ते सातारा आणि कागल ते बेंगलोर या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. मात्र, याच महामार्गाचा भाग असलेल्या आणि वाहतुकीचा सर्वाधिक ताण असलेल्या सातारा ते कागल या 133 किलोमीटर अंतराच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या जवळपास चौदा वर्षांपासून रखडले आहे. दिवसाकाठी तब्बल 89 हजार वाहनांची ये-जा असलेला सातारा-कागल महामार्ग केवळ सहापदरीकरणाअभावी आज राज्यातील सर्वाधिक धोकादायक महामार्ग बनलेला आहे.

नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये झालेल्या करारानुसार या कामाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाची आहे. हे काम रखडण्याची तशी कोणतीही संयुक्‍तिक कारणे दिसून येत नाहीत. या महामार्गासाठी लागणार्‍या जवळपास 2500 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने करून ठेवलेली आहे. या कामासाठी लागणारी जवळपास 97 टक्के जमीन यापूर्वीच अधिगृहित करण्यात आलेली आहे. असे असतानाही आजपर्यंत या कामाला मुहूर्त लागलेला दिसत नाही. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर गेल्या चौदा वर्षांपासून या मार्गाच्या सहापदरीकरणाची गरज आणि मागणी पुढे येत आहे. मात्र, त्याच्या पुढे हे काम सरकायला तयार नाही. 22 डिसेंबर 2017 रोजी नॅशनल हायवेने या कामाची पहिली निविदा काढली होती. त्यानंतर  सप्टेंबर 2018 पर्यंत 11 वेळा या कामाला मुदतवाढ देण्याव्यतिरिक्‍त काहीही झालेले नाही. या महामार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण विचारात घेता, अत्यंत तातडीची बाब म्हणून येत्या वर्षभरात या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

दक्षिण भारतातील बेंगलोर आणि चेन्‍नई या दोन शहरांना मुंबईसह देशातील अन्य शहरांना जोडणारा हा महामार्ग म्हणजे प्रमुख दुवा असतानाही रुंदीकरणाअभावी आज सातारा-कागलदरम्यानच्या महामार्गाला एखाद्या तालुक्यांतर्गत रस्त्याची अवस्था प्राप्त झाली आहे. कारण, या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करीत असताना, सेवारस्त्यांची कामेच करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमधील लोकांकडून आणि वाहनधारकांकडून एखाद्या स्थानिक रस्त्याप्रमाणेच या महामार्गाचा वापर होतो. सेवा रस्त्यांअभावी राष्ट्रीय पातळीवरील वाहतुकीबरोबरच बैलगाड्या, ट्रॅक्टर, रिक्षा, दुचाकी वाहनेसुद्धा याच महामार्गावरून प्रवास करताना दिसतात. आज या महामार्गाच्या कागल ते बेंगलोर आणि सातारा ते मुंबईदरम्यानच्या महामार्गाला समांतर असे सेवारस्त्यांचे जाळे असताना, नेमके याच ठिकाणी सेवारस्ते का गायब झाले आहेत, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. सेवारस्त्यांअभावी या महामार्गावर 34 धोकादायक ठिकाणे निर्माण झाली असून, या ठिकाणी गेल्या चार वर्षांत 174 लोकांना आपला प्राण गमावावा लागला आहे. या सगळ्याला राज्य रस्ते विकास महामंडळाचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

गेल्या चौदा वर्षांपासून सातारा-कागल महामार्गाचे सहापदरीकरण रखडलेले असताना, या मार्गावर सेवारस्तेच उपलब्ध नसताना आणि हा मार्ग आज सर्वाधिक धोकादायक बनलेला असतानासुद्धा, या मार्गावरील वाहनधारकांकडून टोलवसुली मात्र सुरूच आहे. या टोलचे दरसुद्धा अन्य रस्त्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.वास्तविक पाहता, कोणत्याही रस्त्याचे काम अपूर्ण असताना नियमानुसार  त्या मार्गावर टोल आकारता येत नाही, तरी या मार्गावरील टोलवसुली बिनबोभाटपणे सुरू आहे. त्यामुळे किमान सातारा-कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत या मार्गावरील टोलवसुली बंद करण्याची गरज आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने या कामी लक्ष घालून, या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी वाहनधारकांची व या भागातील नागरिकांची मागणी आहे.

एमएसआरडीसीने मांडलाय धंदा!
नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार या रस्त्याचा विकास, देखभाल-दुरुस्ती आणि सुरक्षितता याबाबतची सगळी जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. मात्र, गेल्या चौदा वर्षांच्या कालावधीत एमएसआरडीसीने या महामार्गावरून टोलच्या रूपाने महसूल गोळा करण्याशिवाय दुसरा कोणताही उद्योग केलेला दिसत नाही. आज सातारा-कागल महामार्गाची पुरती वाट लागलेली असताना, कित्येक वर्षांपासून या मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रखडलेले आहे. सेवा रस्त्यांअभावी हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक धोकादायक मार्ग बनलेला आहे आणि एमएसआरडीसीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो लोकांचे बळी जात असताना, एमएसआरडीसीने मात्र तिकडे कानाडोळा करून, केवळ टोल गोळा करायचा धंदा मांडल्याचे दिसत आहे.
याला महामार्ग म्हणायचा तरी कसा?
सातारा-कागल महामार्गालगत कोल्हापूर आणि कराड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व औद्योगिक वसाहती आहेत. याशिवाय, या महामार्गालगत शेकडो हॉटेल्स, ढाबे, पेट्रोल पंप, दवाखाने आणि अन्य स्थानिक संस्था आहेत. सेवारस्त्यांअभावी या महामार्गालगत असलेली गावेसुद्धा रहदारीचा प्रमुख मार्ग म्हणून या महामार्गाचाच वापर करताना दिसतात. त्यामुळे त्यामुळे या महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या आलिशान कार्स, प्रवासी वाहने, अवजड वाहने यांच्या जोडीने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉल्या, रानात जाणारे ट्रॅक्टर, रिक्षा यासारखी हलकी वाहने, हजारो दुचाकी आणि चक्‍क बैलगाड्यासुद्धा धावत असतानाचे विचित्र दृश्य बघायला मिळते. जगाच्या पाठीवरील कोणत्याही महामार्गावर हा असला ‘नजारा’ बघायला मिळत नसेल. त्यामुळे या मार्गाला महामार्ग म्हणणे हे धाडसाचेच ठरेल.