Tue, Jul 07, 2020 20:31होमपेज › Kolhapur › कोल्हापूर दर्शन: या रंकाळ्यातील केंदाळ बघायला; KMTची जाहिरात!

कोल्हापूर दर्शन: या रंकाळ्यातील केंदाळ बघायला; KMTची जाहिरात!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरातल्या सिटीबसवर लावण्यात आलेली एक जाहिरात सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलीय. सायंकाळच्या पिवळ्या किरणांसोबत अल्हाददायक वाऱ्याची झुळूक अनुभवून देणारं ठिकाण म्हणून रंकाळ्याची ओळख आहे. पण, कोल्हापूरच्या पर्यटनाची जाहिरात करताना चक्क या रंकाळ्यात केंदाळ आल्याचंही दाखवण्यात आलंय.

आता अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एखाद्या भाविकानं शहरात रस्त्यांवरून धावणाऱ्या केएमटीबसवर ही जाहिरात पाहिली, तर तो जाईल का रंकाळ्यावर? जाहिरात करताना यांना रंकाळ्याचा चांगला फोटो मिळाला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फिरोज शेख या एका जागरूक कोल्हापूरकारनं काल (शुक्रवार, ३० मार्च) हा फोटो काढला असून, फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर फोटो व्हायरल होऊ लागलाय. 

कोल्हापूर हे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या पर्यटनस्थळांपैकी एक. अंबाबाई, जोतिबा यांच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या करवीर नगरीत अनेक पर्यटनस्थळं आकर्षित करतात. रंकाळा त्यापैकीच एक. पण, गेल्या काही वर्षांत रंकाळा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पहायचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच रंकाळ्याची आणि करवीरच्या पर्यटनाची जाहिरात करताना रंकाळा केंदाळसह दाखवण्यात आल्यानं कोल्हापूरकरांचा संताप होत आहे. मुळात रंकाळ्यात आता केंदाळ मोठ्या प्रमाणावर नाही. रंकाळ्यातील पाणी प्रदूषण हा वेगळा विषय आहे. पण, कोल्हापूरची अस्मिता असलेल्या रंकाळ्याची जाहिरात, अशी केली जाते ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. 

या जाहिरातीच्या फोटोमध्ये शालिनी पॅलेस आणि संध्यामठ दिसत आहे. शॅलिनी पॅलेसचं प्रतिबिंब रंकाळ्याच्या पाण्यात पाहण्याची इच्छा व्हावी, पण इथं जाहिरात काही वेगळंच सांगत आहे. मुळात हा करवीर दर्शन उपक्रम केएमटीचाच म्हणजेच, तो कोल्हापूर महापालिकेचा. मुळात अशा उपक्रमाची जाहिरात होतेय, ही फारच मोठी गोष्ट. पण, केलेली जाहिरात नीट करावी, जेणे करून जाहिरात पाहून करवीर दर्शन करण्याची एखाद्या पर्यटकाची इच्छा होईल. एवढीच माफक अपेक्षा.  
 

Tags : kolhapur tourism advertisement, kolhapur, kolhapur news, kolhapur tourism news, Rankala, KMT, kolhapur municipal corporation 


  •