होमपेज › Kolhapur › कुणी गाळे, फ्लॅट घेता का?

कुणी गाळे, फ्लॅट घेता का?

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:15PMगडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

गेल्या पाच-दहा वर्षांपूर्वी शहरामध्ये एखाद्या ठिकाणी बांधकाम निघाल्यास त्या ठिकाणी गाळे अथवा फ्लॅट घेण्यास लोकांची फारच मोठी झुंबड उडत होती. याचमुळे त्यावेळी रिअल इस्टेटमध्ये फारच मोठ्या प्रमाणात पैसे कमवणे शक्य झाले होते. याचाच अभ्यास करत अनेकांनी यामध्ये नव्याने उडी घेतली खरी; मात्र अलीकडच्या नोटाबंदी, तसेच अन्य कारणांमुळे यामध्ये आलेली मंदी अनेकांना कपाळमोक्षच करणारी ठरली आहे. गडहिंग्लज शहरामध्येही अशीच अवस्था असून, अनेकांनी मोठ-मोठ्या इमारती उभारल्या; मात्र खरेदीदारच नसल्याने कुणी गाळे घेता का, कुणी फ्लॅट घेता का, असे म्हणण्याची वेळ बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. याशिवाय गडहिंग्लज शहर हे आजरा, चंदगड व कर्नाटक परिसरातील काही गावांसाठी मध्यवर्ती असून, या ठिकाणची पूर्वीची बाजारपेठ अतिशय नावाजलेली असल्याने येथे लोकांचा ओढा फार मोठ्या प्रमाणात आहे.

याबरोबरच गडहिंग्लज शहरामध्ये व्यवसायाची सुवर्णसंधी असल्याने अनेकांनी या ठिकाणी मोठ-मोठी दुकाने थाटली आहेत. या सर्वाचा अभ्यास करून गडहिंग्लज शहरामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी रिअल इस्टेटमध्ये नव्याने वेगवेगळ्या गोष्टी करण्यास प्रारंभ केला. शहराची हद्दवाढ झाली नसल्याने आहे त्या जागेमध्ये अनेकांना राहता यावे, यासाठी कोल्हापूर शहरापाठोपाठ येथे फ्लॅट संस्कृती उदयास आली. याचमुळे गडहिंग्लज शहरामध्ये पाच ते सहा वर्षांपूर्वी एखादा फ्लॅटचा टॉवर उभारला की, त्याची पाठोपाठ विक्री होऊन जायची. साहजिकच, यामध्ये बिल्डरांचा घातलेला सर्व पैसा निघून पुन्हा नवीन साईटकडे हे लोक वळत होते.

गडहिंग्लज शहराच्या लोकसंख्येचा विचार न करताच अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मोठ-मोठे रहिवासी टॉवर उभारण्यास प्रारंभ केला गेला. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात गडहिंग्लजमध्ये बांधकामे सुरू झाली असल्याने याचा तोटाच अलीकडे मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यातच नोटाबंदीनंतर या व्यवसायामध्ये मंदीचे प्रचंड सावट आल्याने या अडचणीमध्ये आणखीणच भर पडली आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली बांधकामे व त्यातुलनेने खरेदीदारांची रोडावलेली संख्या, यामुळे गडहिंग्लजमधील बांधकाम व्यावसायिकांची फारच मोठी कोंडी झाली असून, खरेदीदार शोधण्याची वेळ आली आहे.

शहरामध्ये पाच ते सहा वर्षांपूर्वी जागांचे दर भरमसाट वाढल्याने येथील फ्लॅट अथवा गाळ्यांच्या किमतीही त्याच प्रमाणात वाढल्या असून, पुणे, मुंबईच्या दरामध्ये येथील जागांचे दर गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना फ्लॅट अथवा एखादा गाळा घेणे येथे अशक्य झाले आहे. स्क्‍वे. फुटासाठी असलेला दर हा आता तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच गेला असून, त्याचमुळे सर्वसामान्यांनी याकडे पाहण्याचेही धारिष्ट दाखवलेले नाही. साहजिकच, याचा थेट परिणाम खरेदीवर झालेला आहे.

सर्वसामान्यांना परवडणार्‍या फ्लॅटची निर्मिती करण्याची आता आवश्यकता असून, तेही बांधकाम व्यावसायिकांच्या हातात राहिलेले नाही. जागांचे दर मात्र अजूनही तशाच अवस्थेत असून, त्याचमुळे बांधकाम व्यावसायिकांना या दोन्हींचा ताळमेळ घालताना फारच मोठी अडचण येत आहे. साहजिकच, याचा परिणाम फ्लॅट व गाळ्यांच्या खरेदीवर झाला असून, आता बांधकाम व्यावसायिकांना कुणी गाळा, फ्लॅट घेता का..? असे म्हणत खरेदीदार शोधण्याची वेळ आली आहे.