Wed, Jul 08, 2020 09:24होमपेज › Kolhapur › ‘दक्षिणे’त सतेज विरुद्ध महाडिकच ‘सामना’

‘दक्षिणे’त सतेज विरुद्ध महाडिकच ‘सामना’

Published On: May 08 2019 1:56AM | Last Updated: May 08 2019 1:37AM
कोल्हापूर ः सतीश सरीकर

जिल्ह्यात सर्वात संवेदनशील बनलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगावचा पाणीप्रश्‍न पेटला आहे. काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व भाजपचे  आ. अमल महाडिक यांच्यात पाण्यावरून राजकीय जुगलबंदी सुरू आहे. साहजिकच, ‘दक्षिणे’त पारंपरिक कट्टर विरोधक आ. पाटील व आ. महाडिक यांच्यातच विधानसभेचा ‘सामना’ रंगणार, हे स्पष्ट आहे. पाटील हे काँग्रेसचेच उमेदवार असतील. लोकसभा निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप व निकालानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने आ. महाडिक यांचा पक्ष निकालानंतरच ठरेल, असे सांगण्यात येते.  

पराभवाचा वचपा काढण्यासाठी साथ

जिल्ह्यात 2004 पर्यंत विधानसभेचे बारा मतदारसंघ होते. करवीर विधानसभा मतदारसंघातून आ. सतेज पाटील  अपक्ष  लढून राष्ट्रवादीचे  तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पराभव केला होता. पाटील यांना 1 लाख 16 हजार 909, तर खानविलकर यांना 74,305 मते पडली होती. त्यावेळी धनंजय महाडिक व सतेज पाटील एकत्र होते. 1995 च्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी 2004 च्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महाडिक गटाची संपूर्ण ताकद सतेज पाटील यांच्या मागे उभी केली होती. परिणामी, पाटील यांचा विजय सुकर झाला होता. कालांतराने राजकीय वर्चस्वातून पाटील व महाडिक यांच्यात बिनसले.   

मित्रांचा एकमेकांविरुद्ध शड्डू

2009 मध्ये राज्यात मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. आ. पाटील यांचा करवीर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात राहिला नाही. कोल्हापूर उत्तर, दक्षिणमध्ये तो विखुरला गेला. पाटील यांनी 2009 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध एके काळचे त्यांचे जीवलग मित्र धनंजय महाडिक यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. पाटील यांना 86 हजार 949 व महाडिक यांना 81,182 मते मिळाली होती.  महाडिकांना पराभावाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वैर पुन्हा विकोपाला गेले. त्यांचे कार्यकर्तेही एकमेकांना पाण्यात बघू लागले. सध्या पाणीप्रश्‍नावरून टोलेबाजी रंगलेल्या पाचगावसह इतर गावांत पाच वर्षे तणावपूर्ण स्थिती होती. याच आमदारकीच्या कालावधीत पाटील यांना गृह राज्यमंत्रिपद मिळाले. 

सतेज यांचा पराभव अन् विजय

 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सतेज पाटील यांच्याविरुद्ध कोणत्याच राजकीय पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता. धनंजय महाडिक यांनी त्याच वर्षी झालेली लोकसभा निवडणूक लढविली होती. अखेर निवडणुकीच्या अवघ्या 22 दिवस आधी अमल महाडिक यांना भाजपच्या वतीने निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय महाडिक कुटुंबीयांनी घेतला. कमी कालावधी मिळूनही अमल महाडिक यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री पाटील यांचा पराभव केला होता. चुलतभाऊ राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांची पूर्ण ताकदही अमल यांच्या मागे होती. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पाटील यांनी तत्कालीन विधान परिषद सदस्य आ. महादेवराव महाडिक यांचा पराभव करून पुन्हा आमदारकी मिळवली.  

दहा वर्षांपासून राजकीय युद्ध

विधानसभा निवडणुका सहा महिन्यांनंतर आहेत. तोपर्यंत सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यात पाचगावच्या पाणीप्रश्‍नावरून कलगीतुरा रंगला आहे. एकूणच गेली दहा वर्षे कोल्हापूर दक्षिणेत सतेज पाटील विरुद्ध महाडिक यांच्यात राजकीय युद्ध सुरू आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता सहा महिन्यांनंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यातच लढत रंगणार, हे स्पष्ट आहे.

‘कोल्हापूर दक्षिण’मधील राजकारण पुन्हा पेटले...

गेल्या काही महिन्यांपासून ‘दक्षिणे’तील राजकारण पुन्हा पेटले आहे. आ.  पाटील यांनी काँग्रेसमधूनच दक्षिणेतून लढणार, असे जाहीर केले आहे. अमल महाडिक यांनी अद्याप पत्ते खोललेले नसले, तरी ते रिगंणात असणार, हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्यावर ‘गोकुळ’वरून गंभीर आरोप केले. त्यामुळे पालकमंत्री पाटील व महाडिक यांच्यातील संख्या कमी होऊन कटुता आल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींनी येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होईल, या शक्यतेने कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर दावा केला आहे. साहजिकच, लोकसभा निवडणुकीत युतीचा प्रचार न केल्याने महाडिक यांना भाजपची उमेदवारी देण्यापेक्षा तो मतदारसंघ शिवसेनेला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिणामी, लोकसभा निवडणूक निकालानंतरच महाडिक यांचा पक्ष कोणता असेल ते स्पष्ट होईल, असे सांगण्यात येते.