Thu, Jun 24, 2021 11:11
कोल्हापूरातील सर्व व्यापार सुरू करुन देवू : खासदार संजय मंडलिक 

Last Updated: Jun 10 2021 8:56PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

लॉकडाऊनमुळे व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. आता शासनाने व्यापाऱ्यांचा अंत न पाहता व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या शिष्टमंडळाने खासदार संजय मंडलिक यांच्याकडे चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली केली. 

यावेळी अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, लॉकडाऊन मुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आल्याने कोल्हापूर चेंबर व सर्व संलग्न संघटने मार्फत काल व्यापाऱ्यांनी शासनाचे सर्व नियम पाळत कोणत्याही घोषणा न देता आंदोलनाचे फलक हातात घेत शहरातील जवळपास २००० व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानाच्या दारात आंदोलन केले. व्यापाऱ्यांना कामगारांचे पगार व  शासनाचे सर्व कर हे दुकान बंद असतानाही भरावे लागत आहेत. ते वेळेवर न भरल्यास त्यावर दंड व व्याज लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

ते पुढे गेल्या दोन महिन्यांपासून जीवनावश्यक व अत्यावश्यक सोडून इतर सर्व व्यापार बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या खिशात अथवा बँकेत पैसे शिल्लक नाहीत. बहुतेक व्यापाऱ्यांची जमापुंजी संपलेली आहे. गेल्या दीड वर्षांपासून व्यापारावर फार मोठा परिणाम झालेला असल्याने बहुतेक व्यापाऱ्यांचे भांडवल संपलेले आहे. व्यापाऱ्यांना लाईट बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, जीएसटी, घरफाळा, विम्याचे हप्ते, व्यवसाय परवाना, प्रोफेशनल टॅक्स व शासनाचे इतर कर भरावे लागतात. या सर्वांसाठी व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्याने व्यापाऱ्यांना खाजगी सावकांराकडून सोने, वाहने व इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून व्याजाने पैसे घेणेची वेळ आलेली आहे. तेंव्हा सरसकट सर्व व्यापार सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. 

यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी व्यापा-यांना दिलासा देत लवकरच प्रशासनासोबत बैठक घेवून यातून लवकरात लवकर मार्ग काढून सर्व व्यापार सुरु करुन देवू, असे आश्वासन दिले.

यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष व फुटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, उपाध्यक्ष व प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव व स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, संचालक व कन्झ्युमर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, इलेक्रिापकल मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी, संचालक विज्ञानंद मुंढे, संचालक व माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील आदी उपस्थित होते.