Thu, Aug 06, 2020 02:59होमपेज › Kolhapur › अवघे शहर रस्त्यावर

अवघे शहर रस्त्यावर

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 1:32AM

कोल्हापूर : शहरातील देखावे व गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. ( छाया : तय्यब अली)कोल्हापूर : प्रतिनिधी
पावसाने दिलेली उघडीप आणि उद्याची अनंत चतुर्दशीची सुट्टी, त्यामुळे शहरवासीयांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्याचा आनंद लुटला. शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, राजारामपुरी, मंगळवार पेठ आदी परिसरातील आकर्षक गणेशमूर्ती व तांत्रिक देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सहकुटुंब शहरवासीयांनी गणेशमूर्तींचे दर्शन घेतले.

यंदाच्या गणेशोत्सवावर महापुराची गडद छाया असली तरी मंडळांचा उत्साह कायम होता. साधेपणाने मंडळांनी उत्सव साजरा करण्यावर भर दिला. दरवर्षी सुमारे दोनशेहून अधिक सजीव देखावे यंदा केले नाहीत. मात्र, विद्युत रोषणाईच्या झगमगाटात रस्ते न्हाऊन निघाले.  तांत्रिक देखाव्यांची करामत, ऐतिहासिक देखाव्यांची भव्यता, गणपती बाप्पांची नयन मनोहारी आरास पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. त्यामुळे रात्री आठनंतर शहरातील सर्व प्रमुख रस्ते गर्दीने फुलले होते.  

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, मंगळवार पेठ, बुधवार पेठ आदी भागांत गर्दी वाढल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. गणेश दर्शन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी मंडळांचे कार्यकर्ते स्वयंसेवकांच्या भूमिकेत दिसत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, देखावे पाहण्यासाठी रांगा लावणे, वाहतूक कोंडी दूर करणे या कामांसाठी कार्यकर्ते राबताना दिसत होते. छत्रपती शिवाजी चौकातील 21 फुटी श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. मंगळवार पेठ व बुधवार पेठेत आकर्षक गणेशमूर्ती, फुटबॉल खेळासंबंधी सादरीकरण आणि बालगणेश हे आकर्षण ठरले. शाहूपुरी, राजारामपुरी, मंगळवार पेठ परिसरातील  प्रतिकृती, कलात्मक गणेशमूर्ती,  शिल्पाकृती पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. 

गुरुवारी अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्याने अनेक जण रात्रीचे जेवण हॉटेलमध्ये करण्याचा बेत आखूनच घराबाहेर पडले होते. त्यामुळे नाष्टा सेंटरसह हॉटेलमध्ये वेटिंग होते. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. अनेक मंडळांनी दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणाची पूजा घातली होती.  गणेशभक्‍तांना प्रसादाचे वाटप केले जात होते. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठेत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची रात्री उशिरापर्यंत लगबग होती.

कसबा बावड्यातील रस्ते शांत

गेली अनेक वर्षे कसबा बावड्यातील सजीव देखावे हे उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. मात्र, यंदाच्या वर्षी महापुरामुळे कसबा बावड्यात देखावे मंडळांनी रद्द केले. एरवी गणेशोत्सवात रात्री आठनंतर हजारोंच्या संख्येने लोक मुख्य रस्त्यांवर दिसत. यंदाच्या वर्षी कसबा बावड्यातील रस्त्यावर मागील वर्षीच्या मानाने तुरळक गर्दी होती.

उत्सवातून प्रबोधन

पूरग्रस्तांच्या मदतीला शहरवासीय एकदिलाने राबले. मदतीचा हात दिला. प्रशासनाला साथ दिली. याची झलक यंदाच्या उत्सवातून व गणेशमूर्तींतून जाणवली. महापुराच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन स्थितीत करावयाची मदत, घ्यावयाची काळजी, याचे फलक लावून अनेक मंडळांनी प्रबोधन केले.