Wed, Aug 12, 2020 04:00होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : आजरा, गडहिंग्लजला 'चित्री'चे पाणी उशिरा 

कोल्हापूर : आजरा, गडहिंग्लजला 'चित्री'चे पाणी उशिरा 

Last Updated: Dec 11 2019 12:19PM

संग्रहित छायाचित्रसोहाळे (कोल्हापूर) : सचिन कळेकर

आजरा तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री मध्यम प्रकल्प सध्या तुडूंब भरलेला आहे. यंदा झालेली अतिवृष्टी व लांबणीवर पडलेला परतीचा पाऊस यामुळे दरवर्षी सोडण्यात येणार्‍या चित्रीतील पाण्याच्या आवर्तनामध्ये १० ते १५ दिवसांचे अंतर राहणार आहे. डिसेंबर महिन्यात सोडले जाणारे पहिले पाणी यंदा मात्र उशिरा म्हणजे जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात सोडले जाणार आहे. त्यामुळे अगदी शेवटीपर्यंत आजरा तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्याला चित्रीचे पाणी उपलब्ध होईल अशी आशा असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात तर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यंदा १८८६ द. ल. घ. फु क्षमतेचा चित्री मध्यम प्रकल्प २ ऑगस्ट रोजी पुर्ण क्षमतेने भरला. तर गेल्यावर्षी २२ जुलै २०१८ ला चित्री प्रकल्प भरला होता. यंदा चित्री परिसरात ५ हजार २९६ मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी व यंदा चित्री प्रकल्प जुलै व ऑगस्टच्या २ तारखेलाच भरल्याने प्रकल्पातून पहिले पाणी हे जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात सोडण्यात आले. गेल्या १६ वर्षात फक्त सन २०१४ मध्ये प्रकल्प ८८ टक्केच्या दरम्यान भरला होता. व उर्वरीत सर्व वर्षामध्ये चित्री प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. 

सध्या चित्रीतील पाण्याचा विसर्ग बंद असल्याने वीज निर्मितीही बंद आहे. यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस व लांबणीवर पडलेल्या परतीच्या पावसामुळे अजून कोठेही पाण्याची आवश्यकता भासलेली नाही. पाटबंधारे विभागाकडून चित्रीवरील आजर्‍यासह गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळपर्यंत अशा ११ बंधार्‍यांमध्ये पाणी अडविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून या बंधार्‍यांमध्ये साधारणतः ६०० एमसीएफटी पाणीसाठा होतो. या पाणीसाठ्याचे पाटबंधारे विभागाकडून योग्य नियोजन करुन संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जातो. 

गेल्यावर्षी जून महिना कोरडा गेला व त्यानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही दिवसातच चित्री भरण्यास मदत झाली. मात्र त्यातून पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी उपसाबंदी लागू करुन पाऊस चालू होईपर्यंत पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र चालुवर्षी सुरुवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सद्यपरिस्थितीत पाण्याची कमतरता जाणवत नसल्याने यंदा जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात चित्रीतून १८० क्यूसेक्सने पहिले पाणी सोडले जाणार आहे. १४ ते १५ दिवसांनी पाणी सोडले जात असल्याने दरवर्षी पाच आवर्तने होतात. दरवर्षीपेक्षा आवर्तने उशिरा सुरु होणार असल्याने अगदी शेवटपर्यंत पिण्याच्या पाण्यासह पिकांना पाणी उपलब्ध होईल अशी शक्यता असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

यंदाही पाण्याचे योग्य नियोजन करणार : मळगेकर

गतवर्षी पेक्षा चालूवर्षी पाऊस चांगला झाला असला तरी आगामी काळात पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घेवून चित्रीतील पाण्याचा वापर हा काटकसरीने होईल याकरिता आतापासूनच नियोजन केले जाणार आहे. आवर्तने सुरु झाल्यानंतर वेळोवेळी उपसाबंदीही लागू करणार असल्याचे शाखा अभियंता एन. डी. मळगेकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.