Sat, Sep 19, 2020 08:54होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; आणखी 21 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; आणखी 21 पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 10 2020 1:38AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 21 नवे रुग्ण वाढले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 21 वर गेली. सहाजण कोरोनामुक्त झाल्याने पूर्ण बरे झालेल्यांची संख्याही 796 वर गेली. सध्या 257 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,073 वर गेली आहे.

गुरुवारी दिवसभरात सायंकाळपर्यंत 257 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 208 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 36 अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले, तर 13 जणांचे अहवाल 
पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी सांगितले. यानंतर रात्री आणखी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथे आणखी पाचजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित एस.टी. कर्मचार्‍याच्या आईला कोरोना झाला आहे. ती हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी गेली होती. त्यातून संपर्क आलेल्या 20 वर्षीय युवती, 49 वर्षीय महिलेसह 25 वर्षीय पुरुष आणि 59 वर्षीय वृद्धाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा 25 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला.

इचलकरंजीत आज आणखी सात नवे रुग्ण आढळले. यामध्ये सातपुते गल्लीतील 49 वर्षीय पुरुष, लंगोटे मळा येथील 31 व 27 वर्षीय तरुणांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेपारी गल्लीत महिलेचा, बंडगर मळा येथील माजी नगरसेवक, कलानगर येथे डॉक्टरच्या मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माजी नगरसेवक हा लॉकडाऊनसाठी इचलकरंजी नगरपालिकेने घेतलेल्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित होता. यामुळे या बैठकीला उपस्थित असणार्‍या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रात्री उशिरा कोल्हापूर नाका, आंबेडकरनगर येथील 33 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. टाकवडे येथील पाटील गल्लीतील 32 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.

गडहिंग्लजमध्ये आणखी तीन रुग्ण वाढले आहेत. 45 वर्षीय व 39 वर्षीय पुरुषांसह 36 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापूर शहरातील यादवनगरात चौथा रुग्ण आढळून आला आहे. सात वर्षीय बालिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे. फुलेवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजरा तालुक्यातील आरदाळ येथील 29 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. चंदगड तालुक्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. ढोलगरवाडी येथील 36 वर्षीय महिला, शिरोली येथील 29 वर्षीय पुरुष, तर गौलवाडी येथील 55 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, वळिवडे येथील एका 40 वर्षीय तरुणाचा कोरोनाने खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ताप आल्याने त्याने स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. बरे वाटल्यानंतर तो महे (ता. करवीर) येथे एकाचे निधन झाल्याने गेला होता. तेथून आल्यानंतर दि. 5 पासून त्याला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तो खासगी रुग्णालयात दाखल झाला. त्याचा स्वॅब घेण्यात आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला. आज त्याचा मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर नेसरी येथील 75 वर्षीय वृद्धेचा बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिला दि. 5 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

 "