Thu, Jun 24, 2021 11:49
टंचाईवर शून्य रुपये खर्च; मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याचा परिणाम

Last Updated: Jun 11 2021 2:24AM

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्यामुळे यावर्षीदेखील जिल्ह्यात टंचाईवर एक रुपयादेखील खर्च करावा लागला नाही. गेल्या वर्षीही टंचाईवर खर्च झाला नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषदेने तयार केलेला टंचाईचा आराखडा कागदावरच राहणार आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात तसेच पाणी साठवणुकीची व्यवस्था नसलेल्या दुर्गम डोंगराळ भागातील काही गावांना पाणीटंचाई जाणवत असते. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. या आराखड्याचे काम ऑक्टोबरपासून सुरू होते. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांचा सर्व्हे करून हा आराखडा तयार केला जातो. डिसेंबर महिन्यापर्यंत हा आराखडा जिल्हाधिकार्‍यांना सादर होतो.

गेल्या चार वर्षांपासून नियमित आणि वेळेवर पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे आराखड्याची रक्कमदेखील कमी झाली आहे. पूर्वी टंचाईचा आराखडा चार ते पाच कोटींचा असायचा. परंतु; पावसातील सातत्य आणि  ग्रामीण भागामध्ये शासनाच्या वतीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना यामुळे टंचाई कृती आराखडा निम्यावर म्हणजे दोन कोटींवर आला आहे.

यावर्षीचा टंचाईचा आराखडा 2 कोटी 4 लाखांचा होता. मंजुरीसाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात टंचाई आराखड्यातून जिल्ह्यात पाच ते सात ठिकाणी बोअर मारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु; प्रस्ताव सादर केल्यानंतर तीन-चार दिवसांनी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावले. तेव्हापासून आजअखेर अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे बोअर मारण्यासाठी सादर करण्यात आलेले प्रस्ताव नाकारण्यात आले.