Thu, Feb 27, 2020 23:07होमपेज › Kolhapur › पाचगाव प्रकरणावरून तरुणाईने धडा घेण्याची गरज

पाचगाव प्रकरणावरून तरुणाईने धडा घेण्याची गरज

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 24 2018 10:49PMकोल्हापूर : विजय पाटील 

पोरगा काय करतोय! काय नाही, तो अमूक-तमूक नेत्यांसोबत असतो, अशी उत्तरं आपल्याकडे अनेक कुटुंबांत ऐकायला मिळतात. शिकायच्या वयात शिक्षण नाही, कमविण्याच्या वयात रिकामटेकडे असल्याने ‘साहेबांचा विजय असो’ अशा घोषणा देत दिवस ढकलायचे इतकंच काम. मग राजकीय ईर्ष्येने कधीतरी आयुष्याची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. पाचगावच्या रक्‍तरंजित सूडनाट्याने वाट चुकलेल्या तरुणाईचे वास्तव दाखवून दिले आहे. आयुष्यभर तुरुंगात खितपत पडायचे की करिअरवर लक्ष केंद्रित करून सुखा-समाधानात जीवन जगायचे, या दोन पर्यायांचा विचार यानिमित्ताने भरकटणार्‍या समस्त तरुणाईसमोर निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून आयुष्याचा धडा शिकण्याची संधी आली आहे. 

ग्रामपंचायत झाली की पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषदेचे बिगुल वाजतात. पाच-सहा महिने सरतात तोच विधानसभा आणि त्यानंतर लोकसभेचे रणांगण सुरू होते. गावची सोसायटी, पतसंस्था आणि दूध डेअरीची निवडणूक अधेमधे असतेच. तालुक्याचा संघ आणि केडीसीसी, गोकुळसारख्या बलाढ्य सहकारी संस्थांची निवडणूकसद्धा गावागावांत ईर्ष्येचे टोक निर्माण करून जाते. निवडणूक म्हणजे जणू लढाई असंच आपल्याकडे जाणीवपूर्वक चित्र निर्माण करून ठेवलं आहे. त्यामुळे गावागावांत आणि घराघरांत  युद्धातील जय-पराजयासारख्या चर्चा सुरू असतात. तुझा नेता भंकस कसा आहे आणि माझा नेता कसा बाहुबली आहे, अशी चर्चा करत शेवटी प्रकरण हाणामारीत जाते. निवडणूक लढवणारे निवांत असतात. त्यांना लांबून  गमजा बर्‍या वाटतात. मात्र, चहापेक्षा किटली गरम असणारे त्यांचे कार्यकर्ते फुशारक्या मारून वातावरण अधिक गढूळ करत राहतात. आगीत तेल ओतत या  गरम किटल्या आग भडकावत राहतात. शांततेत नांदणारी गावे आतून-बाहेरून रागाने धुमसत राहतात. यातूनच खुनासारखे प्रकार सहज घडतात. हे प्रकार समाजासाठी घातक आहेत. यामुळे तरुणाईत व्यसनाधिनता वाढली आहे. गांजा, गुटखा आदींनी विळखाच घातला आहे. यात अडकलेल्या पोरांचे भविष्यच करपून जाते.

समाजाने आवाज बुलंद करावा

पाचगाव खून प्रकरणातील आरोपींना आजन्म कारवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. आरोपींमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. आता तरुणाईनेही या प्रकरणातून धडा शिकावाच. त्याचबरोबर पालकांनीही मुलांबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. एखाद्या गाव, परिसरात जर अशी टोळकी तयार होऊ लागली तर ज्येष्ठांनी निधडेपणाने आवाज उठवायला हवा.  महिला वर्गानेही संघटितपणे त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सर्वच घटकांनी आवाज बुलंद केला तर  असले प्रकार नक्‍कीच थांबतील.


पोलिसांचे दुर्लक्ष

प्रत्येक गाव आणि परिसराला पोलिसांचा एक बीट अंमलदार असतो. संबंधित पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्‍या गोपनीय विभागाने तर कुठे काय चालले आहे याची खबरबात खात्याला सांगून संभाव्य धोके टाळण्यासाठी काम करायचे असते, पण एकूणच काही गाव-परिसरातील गुंडगिरी पाहता पोलिसांचेही अशा घटनांकडे फारसे लक्ष नसल्यासारखे चित्र आहे.


गर्दीला नसले तरी कॅमेर्‍याला डोळे असतात

गर्दीला डोळे नसतात असं म्हणतात, पण आता या गर्दीत कोण चिथावणी देतोय, कोण दगडफेक करतोय, कुणामध्ये जास्त खुमखुमी आहे आणि कोण हात उगारतोय हे सहज दिसू लागलं आहे. मोबाईलच्या कॅमेर्‍यातून कोणी ना कोणी हे टिपत असते, अन्यथा सीसीटीव्हीत ही दृश्ये कैद होतात. अगदी कॉल रेकॉर्डिंग डिटेल्सवरूनही  घटनेचा उलगडा होतो, पुरावे मिळतात. त्यामुळेच आता अटक आणि तुरुंगवारी ठरली आहे हे समजायला हवे. 


काय करतोस रे तू?

आपला मुलगा नेमका काय करतोय हे पालकांनी सजगपणे पहायला हवे. केवळ उनाडक्या करून जगण्याचे दिवस आता संपले आहेत. दोन-चार डिजिटल फलक लावून स्वत:चीच स्वत: आरती ओवाळणार्‍या कार्यकर्त्यांची नवी जमात आता गावागावांत तयार झाली आहे. चार-पाच पोरं सोबत घेऊन स्वयंघोषित तरुण नेते आता गावागावांत पांढरी कपडे घालून मिरवू लागले आहेत. ही उथळ नेतेगिरी सोबतच्या पोराटोरांनाही बिघडवू लागली आहे. रस्सा मंडळ, ओल्या पार्ट्या दिल्या की पोरंही खूश असं लाचारी आणि चापुलशी शिकवणारे प्रकार सर्रास सुरू आहेत. याला पायबंद घालणे गरजेचे बनले आहे.

Tags : Kolhapur, Youngsters,  need, learn, lesson, issue,  Pachgaon