कोल्हापूर : शेखर दुग्गी
रागाच्या भरात एक चूक झाली अन् आयुष्यभराची शिक्षा मिळाली. राग वेळीच आवरला असता, त्यावर संयम ठेवला असता, तर कदाचित ही वेळ आली नसती. कुटूंब-समाजापासून लांब, चार भिंतीआड आयुष्य घालविण्याची वेळ आली नसती. जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याने ही व्यथा बोलून दाखवली. तुरुंगात असे अनेक कैदी आहेत की ज्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीचे प्रायश्चित करीत आहेत. रागावर नियंत्रण अथवा संयम असो, ही वृत्ती वाढविण्यासाठी बंदिजनांच्या आयुष्यात योग महत्त्वपूर्ण ठरत आहे. कळंबा कारागृह प्रशासनाने सुरू केलेल्या योग शिबिरामुळे बंदिजनांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत.
आरोग्य संपदा व मन:शांतीसाठी योगाचे महत्त्व अन्यनसाधारण आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे. तणाव आणि मानसिक आरोग्य दूर करण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते. जगभरात 21 जून रोजी जागतिक योगदिन साजरा होत आहे. यानिमित्त अनेक शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कळंबा कारागृह प्रशासनाच्या वतीने जेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या योग शिबिराला कैदी बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जवळपास 100 हून अधिक कैदी बांधव योगाचे शास्त्रशुद्ध धडे गिरवत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक राजेंद्र लकडे हे योगाचे नियमित वर्ग घेतात. केंद्रातर्फे कैद्यांसाठी योग अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. कारागृहात रोज सकाळी 7 ते 8.30 याकाळात हे योग शिबिर घेतले जाते. योग वर्गात परदेशी कैदीही सहभागी होतात. त्यांनाही योगाचे महत्त्व पटू लागले आहे. हे कैदी नियमित योगा करीत असल्याचे कळंबा कारागृह प्रशासनाने सांगितले.