Thu, Jun 24, 2021 10:55
राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना दिवस : महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस

Last Updated: Jun 10 2021 9:51AM

मिलिंद सोलापूरकर

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवणार्‍या शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांची छाप आहे. त्यांच्याच संस्कारातून जडणघडण झाल्यामुळे शरद पवार यांनी आपल्या राजकीय वाटचालीत समाजातील महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला नेहमीच प्राधान्य दिले. महिला सक्षमीकरणाचे केवळ नारे देण्यात धन्यता न मानता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना यासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले. त्यांची दखल पुढे जाऊन देशाला घ्यावी लागली आणि देशपातळीवर ते लागू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरणही महिलांच्या हिताचे राहिले आहे.  

जगभरातील अनेक देशांप्रमाणे भारतातही पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमुळे स्त्रियांचे शोषण होत आले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात समानतेचे तत्त्व अंगिकारल्यामुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार देण्यात आला, तरीही स्रियांची उपेक्षा पूर्णतः संपली नाही. त्यामुळेच महिला सक्षमीकरण, स्त्री सशक्तीकरण यांची गरज अधिकत्वाने भासत राहिली; पण हे शब्द केवळ घोषणांपुरतेच किंवा कागदावरच मर्यादित न ठेवता त्यांबाबत ठोस कृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात सातत्याने केला. महिलांना संधी मिळाली, तर त्या कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकतात, यावर पवार यांचा गाढ विश्वास आहे. या विश्वासाच्या बळावरच त्यांनी महिलांना राजकारण, समाजकारणात बरोबरीने संधी देण्याच्या दिशेने पावले टाकली. त्यातून शरद पवार यांच्या दूरदर्शीपणाचे दर्शन अवघ्या देशाला घडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षाचे धोरण महिला हिताचे राहिले आहे.

 1993 मध्ये मुख्यमंत्री असताना पवार यांनी राज्यात महिला धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. अशा प्रकारचे धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते, हे लक्षात घ्यावे लागेल. या धोरणानुसार, महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. कालांतराने त्यात वाढ होऊन 2011 मध्ये हे आरक्षण 50 टक्क्यांवर पोहोचले. शरद पवार यांच्या निर्णयामुळे घराच्या बाहेर निघण्याची मुभा नसलेल्या महिलांना समान संधी मिळाली. महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकल्या. महिला सक्षमीकरणाची संकल्पना घेऊन सुरू झालेला हा विचार शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे महिला विकासाला चालना देणारा ठरला.आज राज्यातील असंख्य महिला मोठ्या हिमतीने गावगाड्यापासून शहरापर्यंतचा कारभार हाकताना आपल्याला दिसताहेत. त्याचे श्रेय पवार यांना जाते. राज्यकर्त्यांनी, अधिकार पदावरील व्यक्तींनी द्यायचे आणि महिलांनी ते स्वीकारायचे, हा वर्चस्ववाद संपुष्टात येऊन महिला निर्णयकर्त्या, धोरणकर्त्या आणि अंमलबजावणीकर्त्या ठरल्या. 

याखेरीज राज्यात पहिल्यांदाच राज्य महिला आयोगाची स्थापना करणारे नेते आणि पहिले मुख्यमंत्री म्हणूनही शरद पवार यांचे  नाव या देशात आदराने घेतले जाते. 

पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. या प्रत्येक पदावर कार्यरत असताना त्यांनी त्या-त्या क्षेत्रातील महिलांचा सहभाग कसा वाढेल, महिलांचे हित कसे साधले जाईल, याचा विचार केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 1991 मध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री असताना शरद पवार यांनी महिलांना तिन्ही सैन्य दलांत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. यासाठी संरक्षण खात्यात महिलांना 11 टक्के आरक्षण देण्यात आले.