Sat, Jul 11, 2020 13:06होमपेज › Kolhapur › महिला पोलिसांचीही आता ब्रास बँडला साथ

महिला पोलिसांचीही आता ब्रास बँडला साथ

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:05AMकोल्हापूर ः पूनम देशमुख

लग्नसमारंभात आता महिलाही मंजूळ स्वर आळवताना दिसत आहेत. कोल्हापूर पोलिस दलाने महिलांना बँड पथकामध्ये संधी दिली आहे. महिला कॉन्स्टेबल अश्‍विनी पाटील व प्रतिभा पाटील यांनी आता पोलिस बँड पथकात स्थान मिळवून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे. 

पोलिस बॅण्ड पोलिस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या बँड पथकात यापूर्वी केवळ पुरुषांचाच सहभाग होता. स्वातंत्र्यदिन असो वा कोणताही मानवंदनेचा कार्यक्रम बँड पथकाशिवाय पोलिस खात्यात पूर्ण होत नाही. परेड म्हटले की, बँड पथक हे समीकरण असतेच. बँड पथकाच्या तालावर शिस्तबद्ध परेड घेतली जाते. विशिष्ट तालावर ही परेड घेण्यात येते, ते बँड पथकाशिवाय शक्य नाही. कोल्हापुरातील पोलिस बॅण्ड पथकाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्ये वाजविली जात नाहीत. तर त्यांनी पारंपरिक बाज टिकवून ठेवला आहे. 

बँड पथकाच्या गणवेशात महिलाही आता बँड वाजविताना दिसणार आहेत. बँड पथक  भरतीसाठी दोन महिला उमेदवारांनी सहभाग घेतला. ही संख्या भविष्यात वाढेल, असा विश्‍वासही व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात पोलिस बॅण्ड पथकात महिलांच्या सहभागाची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांही बँड पथकात उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसत आहेत. बँड पथकातील अश्‍विनी पाटील या अल्टो सॉक्सफोन  तर प्रतिभा पाटील या स्लाईडट्राबोन ही वाद्ये वाजवितात. कोल्हापूरनंतर रत्नागिरी, मुंबई, ठाणे येथील पोलिस बँड पथकात महिला सहभागी झाल्या असून इतर ठिकाणच्या पोलिस बॅण्ड पथकात महिलांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.

दौंड येथेे पोलिस बँड प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात बँडशी संबंधित तीन महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंतचे विविध कोर्सेस आहेत. पोलिस खात्यात नियुक्ती झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार हे कोर्सेस करता येतात. कोल्हापूर पोलिस बँड पथकातील या पोलिस महिला कर्मचार्‍यांनीही हे प्रशिक्षण घेतले आहे. तर बँडचे मेजर श्रीकांत कोरवी यांनी बँडमधील मेजर पदाचा अ‍ॅडव्हॉन्स कोर्सही पूर्ण केला आहे.

असा बदलला पोलिस बँड...

आपली पोलिस बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळून हे बँड पथक कार्यरत आहे. संस्थानकालीन इन्फ्रंट्रीचा बँडपाईप  हा बँड होता. सध्याचा पोलिस बँड ब्रास आहे. बँडची लिपी रोमन आहे. पूर्वी पथकातर्फे फक्त क्वीक आणि स्लो मार्च, राष्ट्रगीत या परेडसाठी वापरल्या जाणार्‍या धून आणि संस्थान गीत होते. आता मात्र काळानुरूप पोलिस बँड पथकानेही बदल स्वीकारले आहेत. बँड पथकातील कर्मचारी आजच्या चित्रपटातील उडत्या चालीची रचनाही उत्कृष्टपणे सादर करीत असल्याचे बँड पथकाचे मेजर कोरवी यांनी सांगितले.