होमपेज › Kolhapur › स्थायी सभापतिपदी प्रथमच महिला

स्थायी सभापतिपदी प्रथमच महिला

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समिती सभापतिपदी मेघा पाटील यांची निवड  होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी निवडणूक होईल. त्यातच पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार असून, महापालिका इतिहासात त्या पहिल्या महिला सभापती ठरणार आहेत. 

नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. पाटील यांच्या अर्जाला अफजल पिरजादे हे सूचक असून, दीपा मगदूम अनुमोदक आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमधून आशिष ढवळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ढवळे यांच्या अर्जाला भाग्यश्री शेटके सूचक व सुनंदा मोहिते अनुमोदक आहेत. उमेदवारी अर्ज भरताना महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, आर. के. पोवार, आदिल फरास आदी उपस्थित होते. 

राहुल चव्हाण होणार परिवहन सभापती
स्थायीमध्ये शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे या एकमेव सदस्या आहेत. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात काटाजोड लढत असल्याने उत्तुरे यांचे मत महत्त्वपूर्ण आहे. आ. राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी सर्किट हाऊसमध्ये शिवसेनेच्या चारही नगरसेवकांची बैठक घेतली. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्याशी आ. क्षीरसागर यांनी चर्चा केली. त्यानंतर राहुल चव्हाण यांना परिवहन सभापती करून उत्तुरे यांनी स्थायीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे ठरले. त्यानुसार चव्हाण यांचा परिवहन सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध ताराराणी आघाडीचे शेखर कुसाळे निवडणूक लढवत आहेत. 

महिला व बालकल्याणसाठी सुरेखा शहा
काँग्रेसकडून महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सुरेखा शहा यांचा अर्ज दाखल झाला. त्यांच्याविरुद्ध ताराराणीच्या अर्चना पागर यांनी अर्ज भरला आहे. पागर यांच्या अर्जाला मेहजबीन सुभेदार सूचक असून, अश्‍विनी बारामते अनुमोदक आहेत. उपसभापतिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून छाया पोवार यांचा तर भाजपमधून बारामते यांनी अर्ज दाखल केला आहे.  

मेघा पाटील सहा महिन्यांसाठी सभापती
स्थायी सभापतिपदासाठी अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण हेही इच्छुक होते. चव्हाण यांनी तर उमेदवारी अर्ज भरलेल्या अर्जाचा फोटो बुधवारी व्हॉटस् अ‍ॅपवरून फिरत होता. त्यामुळे बंडखोरीची चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना इच्छुकांची बंडखोरी टाळण्यात यश आले. मुश्रीफ यांनी सहा-सहा महिन्यांसाठी पदांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाटील यांना सहा महिन्यांसाठी सभापतिपद राहील, असे पत्र दिले आहे. तसेच सहा महिन्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायचा आहे, असाही पत्रात उल्लेख आहे. महापालिकेत आर. के. पोवार यांनी सर्वांसमोर हे पत्र वाचून दाखवले, मात्र सहा महिन्यानंतर सभापती कोण होणार? हे स्पष्ट केलेले नाही.   

थेट पाईपचा सोळांकुर प्रश्‍न मिटणार
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या मेघा या स्नुषा आहेत. त्यांचे मूळ गाव सोळांकुर आहे. योजनेंतर्गत गावातून थेट पाईपलाईन जाणार आहे. परंतु, ग्रामस्थांचा विरोध आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सोळांकुरमध्ये बैठक घेऊन सामंज्यसाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. आता गावची सूनच महापालिकेची पदाधिकारी झाल्याने थेट पाईपलाईनचा प्रश्‍न मिटण्याची शक्यता आहे. 

स्थायी समितीतील पक्षीय बलाबल
सोळा सदस्यांच्या स्थायी समितीत काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, ताराराणी आघाडीचे चार तर भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 8 सदस्य असून, शिवसेनेचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांची संख्या 9 होते. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडे 7 सदस्य आहेत. त्यामुळे मेघा पाटील यांचा विजय निश्‍चित मानला जातो. पाचही पक्षाच्या गटनेत्यांनी आपापल्या सदस्यांना गुरुवारी व्हीप लागू केला.