Wed, Sep 23, 2020 20:56होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’च्या हितासाठी सामंजस्याची भूमिका घेणार : आ. पी. एन. पाटील

‘गोकुळ’च्या हितासाठी सामंजस्याची भूमिका घेणार : आ. पी. एन. पाटील

Last Updated: Jan 22 2020 12:21AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गोकुळ दूध संघ शेतकर्‍यांच्या हिताची भूमिका घेऊन वाटचाल करीत आहे. सद्य:स्थितीत अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला दूध संघ असाच भविष्यातही उज्ज्वल वाटचाल करत राहावा, दूध संघात राजकारण येऊ नये, सामंजस्याने प्रश्‍न मिटावा, यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार पी. एन. पाटील यांनी स्पष्ट केले.

आ. पी. एन. पाटील म्हणाले, राज्यात अनेक दूध संघ डबघाईला आले. अनेकांनी शेतकर्‍यांच्या घामाचे पैसे बुडवले. याउलट गोकुळची दमदार वाटचाल सुरू आहे. आर्थिक काटकसर करीत संचालक मंडळाने दूध संघ चालवला आणि वाढवला. दूध संघाच्या फायद्यातील 100 पैशांपैकी 70 पैसे परतावा देण्याचा नियम आहे. मात्र, गोकुळ दूध संघ 81 पैसे शेतकर्‍याला परतावा देतो. दूध संघाची शेतकर्‍याची नियमित देणी कधीही थकत नाही.

प्रत्येक महिन्याच्या 3, 13, आणि 23  तारखेला शेतकर्‍यांना दूधाचे पैसे दिले जातात. अत्यंत काटकसरीने चालविल्यामुळेच दूध संघाकडे सध्या तब्बल दीडशे कोटी रुपये शिल्‍लक आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणार्‍या गोकुळ मध्ये राजकारण नको, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. 

गोकुळ दूध संघाची निवडणूक राजकारण विरहित होण्याची गरज आहे. गोकुळ दूध संघात यापूर्वी कधीही राजकारण आणले नाही. शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करण्याची भूमिका असणारे सर्वपक्षीय लोक दूध संघात आहेत. राजकीय विचारांची उपरणे संघाच्या बाहेर ठेवूनच सर्वजण काम करत असल्याने गोकुळने प्रगती केली. गोकुळच्या हितासाठी आलेल्या सर्व सूचना संचालक मंडळाने मान्य केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली.

एकूण उलाढालीच्या एकपैसा इतकाही खर्च संचालक मंडळ करत नाही. तरीही संचालकांच्या गाड्या बंद करण्याची सुचना आल्यानंतर त्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला. यंदाची गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझ्यासह दूध संघाच्या सर्व हितचिंतकांची भूमिका आहे. जिल्हा बँक आणि गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. यापूर्वीही मुश्रीफ यांच्याशी जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि राजकारणावर चर्चा होत असते. आताही चर्चा करणार असल्याचे आ. पी. एन. पाटील यांनी सांगितले.

 "