कोल्हापूर : अनिल देशमुख
आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासन आणखी सहा यांत्रिकी बोटी खरेदी करणार आहे. या खरेदीसाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच या बोटी जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी होतील. या बोटींमुळे आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता वाढणार आहे.राज्यातील सर्वाधिक पूर प्रवण जिल्ह्यांपैकी एक अशी कोल्हापूरची ओळख आहे. जिल्ह्यातील सुमारे 129 गावे पूरबाधित असतात. दरवर्षी पूरस्थितीमुळे हजारो लोक बाधित होतात. जिल्ह्यात पूरस्थितीत अनेकदा परिस्थिती गंभीर होती. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता वाढवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ड्रोन’ कॅमेरा खरेदी केला जाणार आहे. यासह आता आणखी सहा यांत्रिकी बोटी खरेदी करण्यात येणार आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आता 12 यांत्रिकी बोटी आहेत. यासह महापालिका, जिल्हा परिषदेच्याही बोटी आहेत. या बोटीद्वारे पूरस्थिती मदत, शोध व सुटका करण्याचे काम केले जाते. त्यात आता सहा बोटींची भर पडणार आहे. या बोटींच्या खरेदीला मान्यता मिळाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.जिल्ह्यातील पूरबाधित 129 गावांत दि. 11 ते दि. 15 जून या कालावधी शोध व सुटका याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरिता प्रत्येक गावातील दहा स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.
35 ‘आपदा’ मित्र तयार
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे ‘आपदा’ मित्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 35 तरुणांना आपदा मित्र म्हणून नागपूर येथील राष्ट्रीय नागरी सुविधा महाविद्यालयात 15 दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून बचावाच्या विविध वस्तू तयार करून त्याचा प्रत्यक्ष वापर करत आपत्तीवर मात कशी करायची यापासून ते आपत्तकालीन परिस्थितीतील विविध प्रकाराचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स्, ड्रम तसेच वाळलेल्या गवतापासून लाईफ जॅकेट बनवण्याचे तंत्रही यांना शिकवण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे आपदा मित्र कार्यरत राहणार आहेत.