Wed, Dec 02, 2020 09:20होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात पतीची नोकरी गेल्याने पत्नीची आत्महत्या

कोल्हापुरात पतीची नोकरी गेल्याने पत्नीची आत्महत्या

Last Updated: Jul 07 2020 8:06AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

लॉकडाऊन काळातील आर्थिक मंदीत पतीची नोकरी गेल्याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सुभाषनगर येथील 28 वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (रा. केशवराव साळोखेनगर) असे तिचे नाव आहे. मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे हळहळ व्यक्‍त होत आहे. सागर आणि नीलम दाम्पत्याला दोन अपत्ये आहेत. 

अधिक वाचा :  महापूर नियंत्रणासाठी नदी प्रवाहित ठेवा

पती खासगी फर्ममध्ये कामाला होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक मंदी निर्माण झाल्याने संबंधित फर्ममधून कामगारांची कपात करण्यात आली. त्यात पतीलाही नोकरी गमवावी लागली. नोकरी गेल्याने नीलम यांना धक्‍का बसला. त्यातूनही दोघांनी किरकोळ कामे करून संसाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीनेही धुण्या-भांड्याची कामे सुरू केली; पण घरखर्च निघत नव्हता. 

अधिक वाचा : जिल्ह्यात आणखी 18 रुग्ण आढळले

कोवळ्या मुलांची उपासमार होऊ लागल्याने दाम्पत्य तणावात होते. बुधवारी (दि. 1) सकाळी पती कामधंदा शोधण्यासाठी घरातून पडला होता. लहान मुले घरात खेळत होती. दरम्यान, नीलमने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार दिरासह नातलगांच्या निदर्शनास आला. गळफास सोडवून बेशुद्धावस्थेत नीलमला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सोमवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.