Sat, Jul 04, 2020 02:20होमपेज › Kolhapur › कोण रुजणार : धनुष्यबाण की शेट्टींचे नवीन ‘वाण’!

कोण रुजणार : धनुष्यबाण की शेट्टींचे नवीन ‘वाण’!

Published On: Apr 18 2019 2:05AM | Last Updated: Apr 17 2019 8:48PM
सुनील कदम

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण या मतदारसंघात नव्याने आकाराला आलेली काही राजकीय समीकरणे. साखर सम्राटांच्या छाताडावर उभे राहून राजू शेट्टी यांनी आजपर्यंत या मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक जिंकलेली आहे; पण यंदा मात्र शेट्टी यांनी एकेकाळी त्यांचे जणू काही हाडवैरी असलेल्या साखर सम्राटांच्या गळ्यात गळे घातलेले आहेत. शेट्टी यांची ही बदलती भूमिका त्यांचे हक्‍काचे मतदार असलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना रुचणार की रुतणार, यावरच हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांचा ‘धनुष्यबाण’ रुजणार की शेट्टी यांचे ‘नवीन राजकीय वाण’ रुजणार, याचा फैसला होणार आहे.

‘शिवार ते संसद’ असा राजू शेट्टींचा गेल्या जवळपास वीस वर्षांतील प्रवास प्रामुख्याने  ऊस आणि दूध दराच्या मुद्द्यावरूनच झालेला आहे. साधारणत: 2000 साली राजू शेट्टी यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. शेतकरी संघटनेचे आक्रमक कार्यकर्ते असलेल्या शेट्टी यांनी पहिल्यांदा उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक जिंकून राजकीय आखाड्यात उडी घेतली. साधारणत: यानंतर एक-दोन वर्षांतच पश्‍चिम महाराष्ट्राच्या या ऊसपट्ट्यात ऊस दराच्या आंदोलनाचा आगडोंब उसळला. त्यानंतर 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, यावरून शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यात मतभेद निर्माण होऊन शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. ऊस आंदोलनात साखर सम्राटांच्या चिथावणीवरून झालेल्या पोलिसी लाठीमारात शेट्टी यांनी अक्षरश: रक्‍तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला; पण या रक्‍तबंबाळ कार्यकर्त्याला शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी 2004 साली थेट राज्याच्या विधानसभेचे दरवाजे खुले करून दिले आणि हळूहळू पश्‍चिम महाराष्ट्रातील झाडून सारा ऊसपट्टा शेट्टी यांनी आपल्या कवेत घेतला. त्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात सातत्याने राजू शेट्टी विरुद्ध साखर कारखानदार, असा सामना रंगत आलेला आहे.

‘आपला आवाज’ संसदेत घुमला पाहिजे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडले गेले पाहिजेत, या भूमिकेतून 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत साखर पट्ट्यातील शेतकर्‍यांनी राजू शेट्टी यांना संसदेत धाडले. या निवडणुकीत या भागातील बहुतेक सगळ्या साखर कारखानदारांनी विरोध करूनसुद्धा शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवार निवेदिता माने यांचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला. ही जी काही ताकद होती, ती प्रामुख्याने ऊस आणि दूध उत्पादकांचीच होती. त्यानंतर 2014 च्या लोकसभेत राजू शेट्टी यांनी भाजपशी हातमिळवणी केली; पण भाजप म्हणजे काही साखर सम्राटांचा पक्ष नाही, शिवाय शेट्टी यांचा साखर सम्राटांविरुद्धचा लढा सुरूच राहणार, या भूमिकेतून या भागातील शेतकर्‍यांनी दुसर्‍या वेळेसही त्यांच्या पारड्यात पहिल्यापेक्षा भरभरून दान टाकले.

यावेळची परिस्थिती मात्र एकदम वेगळी आहे. आजपर्यंत ज्या साखर सम्राटांविरुद्ध शेट्टी यांची लढाई होती, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीतील साखर सम्राटांशी शेट्टींनी दोस्ताना जमविला आहे. नुसता दोस्ताना नव्हे; तर सांगलीमध्ये त्यांनी विशाल पाटील यांच्या रूपाने एका साखर कारखानदारालाच उमेदवारी बहाल केलेली आहे. त्यामुळे अर्थातच ऊस उत्पादकांसह सर्वसामान्य मतदारांच्याही भुवया उंचावल्या आहेत. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने आपण काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र त्यांचा हा दावा प्रामुख्याने ऊस आणि दूध उत्पादकांच्या कितपत पचनी पडणार, हाच प्रश्‍न आहे. आजपर्यंत ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचा शेट्टींचा निर्णय या भागातील अनेकांना रुचला नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्याचप्रमाणे गेली पंधरा-वीस वर्षे आपणाला नडणार्‍या शेट्टींशी केलेली साथसंगत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्या-कार्यकर्त्यांनाही रुचलेली नाही.

2014 साली राजू शेट्टी हे भाजप-सेना युतीसोबत असल्याने शेतकरी संघटनेसह या दोन पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी होती. त्यामुळे ते पावणेदोन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मात्र आज ही राजकीय गोळाबेरीज बदललेली आहे. या मतदारसंघात सत्यजित पाटील (शिवसेना - शाहूवाडी), उल्हास पाटील (शिवसेना - शिरोळ), सुजित मिणचेकर (शिवसेना - हातकणंगले), सुरेश हाळवणकर (भाजप - इचलकरंजी) आणि शिवाजीराव नाईक (भाजप - शिराळा) असे युतीचे पाच आमदार आहेत. हे पाचही आमदार युती धर्म म्हणून धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहिलेले दिसतात; तर केवळ जयंत पाटील (राष्ट्रवादी - वाळवा) हे एकमेव आमदार शेट्टी यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे स्वत:च्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद, या भागातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि सर्वसामान्य मतदारांच्या भरवशावर राजू शेट्टी यांना वाटचाल करावी लागणार आहे. शिवाय त्यांचे कालचे मित्र आज त्यांच्यापुढे शत्रू म्हणून उभारणार आहेत, ते वेगळेच. अशा बदलत्या परिस्थितीत राजू शेट्टी हॅट्ट्रिक करतात की ‘त्रिफळाचीत’ होतात, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना राजकारणाचा प्रदीर्घ कौटुंबिक वारसा असला तरी वैयक्‍तिकदृष्ट्या ते अजून तरी या प्रांतात नवखे ठरतात. या मतदारसंघात भाजपचे दोन आणि शिवसेनेचे तीन आमदार आहेत. म्हणजे कागदावरील गणित तरी माने यांच्या बाजूने झुकत असल्याचे दिसते; पण कागदावरचे गणित आणि प्रत्यक्षातील राजकीय वाटचाल यांचा ताळमेळ प्रत्येकवेळी जमतोच अशातला भाग नाही. पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या मतदारसंघात राजू शेट्टी यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. शेट्टी यांनी आपली भूमिका बदलली म्हणून हा मतदार लगेचच शेट्टी यांची साथ सोडून देईल, असे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. कारण हा मतदार राजू शेट्टी आणि ऊस-दूध दर एवढ्यापुरते मर्यादित हितसंबंध जपणारा अशा स्वरूपाचा आहे. शेट्टी यांनी काय राजकीय भूमिका घ्यायची, याच्याशी या मतदाराला काही देणे-घेणे असल्यासारखे वाटत नाही. कारण पूर्वीही कुणी या मुद्द्यावरून त्यांच्याशी फारकत घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेट्टी यांची ही ताकद त्यांच्या विरोधकांनाही मान्यच करावी लागेल.

दुसरी बाब म्हणजे या मतदारसंघात जरी युतीचे पाच आमदार असले तरी त्यांच्या त्यांच्या विजयातसुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी शेट्टी यांच्यासह त्यांच्या शेतकरी संघटनेचे योगदान होते, हे मान्यच करावे लागेल. शिवाय काही बदलते राजकीय प्रवाहही विचारात घ्यावे लागतील. शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी चालविलेली आहे. या ठिकाणी महाडिक गटाने धैर्यशील माने यांना पाठिंबा दिला आहे. अशावेळी भविष्यातील हा राजकीय संघर्ष नजरेसमोर ठेवून शिवाजीराव नाईक हे किंवा त्यांचा गट आतल्या अंगाने राजू शेट्टींशी लगट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांचा वारसा असलेल्या शिराळा आणि वाळवा या दोन तालक्यांत अजून तरी शिवसेनेचा धनुष्यबाण जनमानसात फारसा रुजलेला दिसून येत नाही. शिवाय या दोन तालुक्यात जयंत पाटील यांची निर्णायक ताकद आहे, हे कुणालाही मान्य करावेच लागेल. त्यामुळे या दोन तालुक्यांवर माने यांना फार मोठी भिस्त ठेवण्यासारखी सध्याची तरी अवस्था नाही.

इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ आणि शाहूवाडी या चार विधानसभा मतदारसंघात मात्र भाजप-सेना युतीची ताकद काकणभर वरचढ असल्याचे मान्य करावे लागेल. मात्र या ताकदीचा माने यांच्यासाठी वापर होतो की नाही, हे महत्त्वाचे आहे. कारण विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना आपल्याविरोधी भूमिका घेऊ नये म्हणून काही मंडळी शेट्टींच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे झाले तर त्याची जबर किंमत धैर्यशील माने यांना मोजावी लागल्याशिवाय राहणार नाही. नेमकी ही बाब हेरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांना परवाच्या कोल्हापूर दौर्‍यात बर्‍यापैकी डोस दिल्याचा बोलबाला आहे. त्याचप्रमाणे जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांनी अजून तरी आपले पत्ते ओपन केलेले दिसत नाहीत. कोरे यांची भूमिकासुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडायला कारणीभूत ठरणार आहे. एकूणच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांची ‘बॅट’ धावांचा वर्षाव करणार की धैर्यशील माने यांचा ‘धनुष्यबाण’ अचूक लक्षवेध करणार याची राज्यभरात उत्सुकता असलेली दिसते.

चर्चा ‘महादेव’ फॅक्टरची!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी आहे. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघात साहजिकच शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या सोबत असलेली दिसते. मात्र त्याचवेळेस महादेवराव महाडिक यांचे बंधू नानासाहेब महाडिक यांनी शिराळा-वाळवा तालुक्यातून युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर करून त्यांचा प्रचारही सुरू केला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संघटना कोल्हापूरच्या बाबतीत काय भूमिका घेते याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र यावर उतारा म्हणून महादेवराव महाडिक यांनी शिराळा-वाळवा सोडून इतर चार मतदारसंघातील आपली ताकद शेट्टींना देऊ केल्याची चर्चा आहे.