कोल्हापूर : प्रतिनिधी
ज्याचे काम अधिक आहे, त्याला जास्त जागा मिळणारच. आमचे काही भागात काम कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला कमी जागा मिळणार, विरोधकांना जास्त जागा मिळतील. विरोधकांना अधिक जागा मिळतील त्या ठिकाणी विरोधक ईव्हीएम मशिनबाबत काय भूमिका घेणार, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदेखील मान्य करायचा नाही, ही प्रवृत्ती योग्य नाही, असेही ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात युतीच्या 44 जागा येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या घरातील एकही व्यक्ती यावेळी लोकसभेत नसणार, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
खरीप हंगामपूर्व बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, प्रसिद्धी मिळत असल्यामुळे सध्या रोज माझ्या नावाने विरोधक ओरडत आहेत. खा. शेट्टी यांनी, कमी व्याज असल्यामुळे शेतकरी कर्ज घेतात आणि ती रक्कम एफडी करतात, असे वक्तव्य केल्याचा आरोप केला. किमान काय बोललो हे तरी त्यांनी बोलण्यापूर्वी समजून घ्यावयास हवे होते. शेतकर्यांसाठी आपण एक योजना तयार केली आहे. शेतीतून मिळणार्या उत्पन्नातून शेतकर्यांनी सरकारकडे ठेव म्हणून दहा हजारच्या पटीत रक्कम ठेवावी. त्यावर दरमहिन्याला त्यांना व्याज दिले जाईल. त्यामुळे शेतकर्याला प्रत्येक महिन्याला ठराविक अशी रक्कम मिळेल आणि त्याला हातभार लागेल. ठेवीच्या रकमेलादेखील 50 हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. याबद्दल आपण बोलत असताना खा. शेट्टी यांनी त्याचा विपर्यास केला. आपली फार शेती नाही. त्यांची अधिक असेेल; पण मीही शेतकर्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकर्यांची दु:खे खा. शेट्टी यांनी आपणास सांगू नयेत.
रास्ता रोको करून त्रास
कोणाचेही नाव न घेता पालकमंत्री पाटील यांनी, आणखी एका महान नेत्यांनी आपण श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी निधी दिला नसल्याने काम होऊ शकत नाहीत, असा आरोप केला. आंदोलन करण्यापूर्वी किमान त्यांनी महिती घ्यावयास हवी होती. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी 89 कोटी मंजूर झाले आहेत. जोतिबा डोंगरसाठी देखील 25 कोटी मंजूर झाले आहेत. त्याला तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. त्यातील पहिला हप्ता सात कोटी प्राप्त झाला आहे. जोतिबा डोंगर विकासासाठीदेखील पाच कोटी आले आहेत. आचारसंहितेमुळे हे काम थांबले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही कामे सुरू होतील. कामे सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्याने निधी दिला जाईल. असे असताना रास्ता रोको करून लोकांना त्रास दिला आहे, असेही ते म्हणाले.
एक्झिट पोलबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, एक्झिट पोलचा कल पाहून विरोधकांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. व्हीव्हीपॅटबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यातील चिठ्ठ्या मोजता येणार नाहीत, असे समजून सांगण्यात आले. तरीदेखील ही मंडळी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, ही बाब चिंताजनक आहे. विरोधक ज्या ठिकाणी निवडून येतील, त्या ठिकाणच्या ईव्हीएम मशिनबाबत विरोधक काय निर्णय घेणार? एक्झिट पोलमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा विरोधकांना जादा जागा मिळाल्या, तर विरोधक काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.