Thu, Feb 27, 2020 22:07होमपेज › Kolhapur › राम मंदिर बांधकाम जमा-खर्चाचे काय?

राम मंदिर बांधकाम जमा-खर्चाचे काय?

Published On: Jun 04 2019 1:30AM | Last Updated: Jun 04 2019 1:30AM
कागल ः प्रतिनिधी

कागलमधील श्रीराम मंदिराची अद्यापही काही कामे प्रलंबित आहेत. या कामासाठी पालिका दोन कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. मात्र मंदिराचा मी उपाध्यक्ष असून देखील मला एकाही मिटिंगला बोलाविण्यात आले नाही. खर्च किती झाला आणि शिल्‍लक किती आहे? सद्य:स्थिती काय आहे? याची माहिती नाही, असे आ. हसन मुश्रीफ म्हणाले.

कागल नगरपालिकडे नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण योजनेतून देण्यात येणार्‍या कल्याण निधीच्या धनादेश वाटप कार्यक्रमात आ. मुश्रीफ बोलत होते. हा कार्यक्रम श्रीराम मंदिराच्या हॉलमध्ये घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी होत्या. यावेळी पालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना धनादेशाचे वाटप मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांगांच्या वतीने मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.

आ. मुश्रीफ म्हणाले, शासनाला देण्यात येणारे श्रीराम मंदिराच्या जमाखर्चाचे विवरणही अद्याप देण्यात आलेले नाही. मंदिरात नुसतेच कार्यक्रम करणे योग्य नाही. उर्वरित कामासाठी पैसे नसतील तर देण्यास आम्ही तयार आहोत, असे पत्र मंदिराचे ट्रस्टी प्रवीणसिंह घाटगे यांना आपण पाठविणार आहे.

स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे मंदिर उभारणीच्या वेळी आमच्याशी सल्‍लामसलत करीत होते. बैठका होत होत्या. त्यांच्या सांगण्यावरूनच जुन्या मंदिरातील अनेक संस्था खाली करण्याचे काम करण्यात आले. मंदिराचे राजे अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष होतो. मात्र राजेंचेे निधन झाल्यापासून मंदिरातील मिटिंगला उपाध्यक्ष असूनही मला बोलाविण्यात आले नाही. मंदिरासाठी पालिकेच्या वतीने सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा शेतकर्‍यांचा पैसा आहे. याचा सर्व हिशेब आणि जमाखर्च करून नगरविकास खाते मंदिराकडे प्रमाणपत्र मागत आहे. मात्र ते अद्याप देण्यात आलेले नाही. मंदिरात नुसतेच कार्यक्रम करणे योग्य नाही, असे मुश्रीफ म्हणाले. 

आ. मुश्रीफ म्हणाले, दिव्यांगांकडे समाजानेच लक्ष देण्याची गरज आहे. आपण या खात्याचे मंत्री असताना नवीन कायदा करून दिव्यांगांना वाढीव पेन्शन सुरू केली. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आली, तर निराधारांना दोन हजार आणि दिव्यांगांना पाच हजार रुपये पेन्शन सुरू करण्यात येईल. 
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

प्रास्ताविक नगराध्यक्षा सौ. माणिक माळी यांनी केले; तर स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. ज्येष्ठ नागरिक शामराव पाटील, दिव्यांग भगिनी विमल घाटगे यांची भाषणे झाली. माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर, मुख्याधिकारी टिना गवळी, दिव्यांग संघटनेचे सुरेश शेळके, माजी उपनगराध्यक्षा सौ. वर्षा बन्‍ने, पी. बी. घाटगे, संजय चितारी, नगराध्यक्षा आशाकाकी माने आदी उपस्थित होते.