Sat, Jul 11, 2020 20:07होमपेज › Kolhapur › तहान चिकोत्रा काठची; आधार मात्र वेदगंगेचा!

तहान चिकोत्रा काठची; आधार मात्र वेदगंगेचा!

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:09PMहमीदवाडा : मधुकर भोसले

अवर्षणग्रस्त असलेल्या चिकोत्राच्या खोर्‍यातील, चिकोत्रा काठच्याच तहानेने व्याकूळ झालेल्या काही गावांसाठी बारमाही वाहणारी वेदगंगा धावून जात आहे, असेच म्हणावे लागेल. विशेषत: चिकोत्रा नदीच्या अंतिम टप्प्यातील म्हणजेच प्रामुख्याने लिंगनूर पंचक्रोशीतील गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी वेदगंगेवरून पाणी योजना करण्याच्या निर्धाराला गती देण्याचे काम सुरू केले आहे. 

चिकोत्रा नदीवर एकूण 28 बंधारे आहेत. त्यापैकी लिंगनूर, गलगले व मेतके हे अखेरचे तीन बंधारे प्रकल्पातून सोडलेले पाणी पोहोचेपर्यंत तिष्ठत असतातच मात्र जरी पाणी पोहोचले तरी अवघ्या एक - दोन दिवसांत पात्र कोरडे पडते. त्यामुळे महिन्यातील 20 ते 22 दिवस पिण्याच्या पाण्यासाठी या परिसरातील गावांना भटकंती करावी लागते. त्यामुळेच सर्व प्रथम नदीच्या अगदी काठावर असणार्‍या खडकेवाडा या गावाने चिखली येथे जागा घेऊन वेदगंगा काठावरून पाणी योजना यशस्वीपणे पूर्ण केली.

हमीदवाडा या गावामध्ये तर वेदगंगेवरून पाणी आणण्यासाठी मोठा विषय झाला होता. इतकेच नव्हे तर चिकोत्रावरील पाणी योजनेला विरोध करत वेदगंगेवरील योजनेसाठी येथील नागरिक विजय साटपे व सुनील निर्मळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली आहे. याबाबतचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मात्र, गेल्याच महिन्यात मंडलिक कारखान्याच्या माध्यमातून हमीदवाडा ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून वेदगंगेचेच पाणी गावामध्ये उपलब्ध केले आहे.

लिंगनूर कापशी येथील ग्रामपंचायतीने देखील चिखली येथून वेदगंगेच्या पाण्यासाठी पाईपलाईनचे काम आमदाम मुश्रीफ यांच्या हस्ते सुरू केले आहे. याबरोबरच घोरपडे साखर कारखान्याने सुद्धा बस्तवडे येथे वेदगंगा काठावर जागा घेऊन चिकोत्रा खोर्‍यातील काही गावांसाठी पाणी योजना करून ऊस उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले आहे.  

वेदगंगेपासून तीन ते पाच कि. मी. पर्यंत

लिंगनूर पंचक्रोशीतील गावे ही चिकोत्राच्या अखेरच्या विभागात आहेत. या गावांपासून वेदगंगेचे अंतर तीन ते पाच कि. मी. पर्यंत आहे. त्यामुळे आधुनिक साधनांचा वापर करत ही काही गावे वेदगंगेवरून पाणी आणत आहेत. अवघ्या पाच कि. मी. च्या अंतरावर बारमाही वाहणारी वेदगंगा तर दूसरीकडे अवर्षणग्रस्त चिकोत्रा असे विरोधाभासी चित्र आहे. अर्थात वेदगंगेवरून पाणी नेण्यासही जवळच्या अंतराची गावे वगळता खोर्‍यातील अन्य गावांना मात्र वेदगंगेवरून पाण्याचा पर्याय हा तितका सोपा नाही.