Fri, Jul 10, 2020 02:57होमपेज › Kolhapur › बायोमेडिकल इंजिनिअर बनायचंय?

बायोमेडिकल इंजिनिअर बनायचंय?

Published On: May 29 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 10:14PMवैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर वाढला आहे. या आधारावरच असाध्य आणि आव्हानात्मक आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. अशा कठीण स्थितीत उपकरणाच्या मदतीने आजाराचे कारण आणि उपचाराची दिशा समजणे डॉक्टरांना सोपे झाले आहेच, त्याचबरोबर वेळेचीही बचत होत आहे. अर्थात उपकरणे हाताळून ते वापरणे आणि त्याच्या मदतीने रुग्णांची चांगल्या रितीने तपासणी करणे ही बाब सोपी नाही. अशा स्थितीत इंजिनिअरिंगची वेगळी शाखा या कामावर विशेष लक्ष देण्याचे काम करते. या शाखेला बायोमेडिकल इंजिनिअरिंग (बीएमई) असे म्हणतात. वैद्यकीय उपकरणांचा वापर करणार्‍यांना बायोमेडिकल इंजिनिअर असे म्हणतात. बायोमेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरला भरपूर वाव आहे. मेडिसिन आणि हेल्थकेअरमध्ये आवड असणारे  या क्षेत्रात करिअर करू शकतात. 

बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय?

तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास बायोमेडिकल इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंगची अशी शाखा आहे, त्यात मेडिकल अ‍ॅप्लिकेशन्स, विविध उपचार किंवा डायग्‍नोस्टिक टेक्नॉलॉजीच्या विकास आणि संशोधनासाठी इंजिनिअरिंग सिद्धांताची मदत घेतली जाते. बायोमेडिकल इंजिनिअरचे काम हे वैद्यकीय उपकरणांची देखभाल करण्याचे आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये अनेक उपशाखा आहेत. त्यात कोणत्याही एका शाखेत आपण प्रावीण्य मिळवू शकतो. यात बायोइंस्ट्रूमेंटेशन, बायोमटेरियल्स, सेल्यूलर टिशू अँड जेनेटिक इंजिनिअरिंग, क्लिनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल इमेजिंग, ऑर्थोपेडिक बायोइंजिनिअरिंग रिहॅबिलिटेशन इंजिनिअरिंग आदींचा समावेश आहे. 

बायोमेडिकल इंजिनिअरला मेडिकल डिव्हाईसवर रिसर्च करणे, टेस्टिंग आणि मूल्यांकनसंबंधी काम करावे लागते. रुग्णालय आणि मेडिकल सेंटरसाठी नवीन बायोमेडिकल सामानाची खरेदी देखील करावी लागते. बायोमेडिकल इंजिनिअर मेडिकल डिव्हाईस, स्पोर्टस् मेडिसिन, स्टेम सेल रिसर्च, बायोमेकर्स, जीनोमिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळवू शकता. बायोमेडिकल इंजिनिअरिंगसंबंधी प्रोजेक्टसमध्ये कृत्रिम अवयव आणि प्रोस्थेटिक लिंब्स, संगणकाच्या मदतीने होणारे वैद्यकीय उपचार, तंत्रज्ञान विज्ञान आणि मेडिकल इमेजिंगचा यात समावेश आहे. 

शैक्षणिक पात्रता

बायोमेडिकल इंजिनिअरिंगसंबंधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला सायन्स स्ट्रिममध्ये 10+2 आवश्यक आहे. बायोमेडिकल इंजिनिअरला इंजिनिअरिंग, भौतिक, रसायन आणि जीव विज्ञानात पदवी घषणे गरजेचे आहे. बहुतांश बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. आजकाल काही संस्थांत बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपातळीवर बी.टेक अभ्यासक्रम देखील सुरू केला आहे. यात क्लिनिकलसंबंधी अभ्यासक्रम देखील पूर्ण करावे लागतात. वैद्यकीय क्षेत्रात ज्यांना संशोधन करायचे आहे, ते बायोमेडिकलमध्ये एम.फील किंवा पीएच.डी. करू शकतात. 

रोजगाराची संधी

या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बायोमेडिकल इंजिनिअर रुग्णालयात, नर्सिंग होम्स, रिसर्च लॅब्स, औषध तयार करणार्‍या कंपन्या तसेच हेल्थकेअर कंपन्यांत देखील रोजगाराची संधी मिळू शकते. याशिवाय बायोमेडिकल इंजिनिअर प्रॉडक्ट टेस्टिंग, डिझायनिंग वैद्यकीय उपकरणांचे उपयोग आणि देखभालीसंदर्भात काम करू शकतात. 

प्रमुख संस्था

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्‍ली
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नवी दिल्‍ली

- विशाखा पाध्ये