Thu, Feb 27, 2020 23:46होमपेज › Kolhapur › कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालय प्रतीक्षेत

कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालय प्रतीक्षेत

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:17PMकोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर, मीरा-भाईंदर व अकोला येथील पोलिस  आयुक्‍तालयांचा प्रस्ताव वेटिंगवर आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय झाले असले, तरी निधीची उपलब्धता व त्याआधारे पोलिस भरती झाल्याशिवाय ही पोलिस आयुक्‍तालये करणे शक्य नसल्याचे गृह खात्याच्या सूत्रांनी सांगितले.पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रत्यक्षात आणताना पोलिस भरती ज्या प्रमाणात पाहिजे तेवढी ती नव्हती. लगतच्या  परिसरातून पोलिसांची कुमक घेऊन हे पोलिस आयुक्‍तालय तयार करण्यात आले. गेल्या काही दिवसांत या भागातील गुन्हेगारी वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर  गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी हे पोलिस आयुक्‍तालय तातडीने करण्याची गरज समोर आल्यानंतर त्याला गती देण्यात आली. 

पोलिस आयुक्‍तालय स्थापन करण्यासाठी किमान तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या असणे अपेक्षित आहे. या संपूर्ण यंत्रणेला पुरतील अशी वाहने व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असते. जिल्ह्याएवढेच मनुष्यबळ शहराच्या पोलिस आयुक्‍तालयासाठी उपलब्ध करून देणे सध्याच्या परिस्थितीत कितपत शक्य होईल, याचा अंदाज घेतला जात आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत निधीची उपलब्धता झाल्याशिवाय कोल्हापूर, मीरा-भाईंदर व अकोला ही सरकारने जाहीर केलेली पोलिस आयुक्‍तालये स्थापन करणे सध्या तरी शक्य नसल्याचे समजते.

Tags : Kolhapur, Waiting, Police Commissioner, office, Kolhapur