Wed, Sep 23, 2020 22:11होमपेज › Kolhapur › ईर्ष्येने मतदान; तरुणांचा कौल ठरणार निर्णायक

ईर्ष्येने मतदान; तरुणांचा कौल ठरणार निर्णायक

Published On: Apr 24 2019 1:38AM | Last Updated: Apr 24 2019 1:38AM
कोल्हापूर : विजय पाटील 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानादिवशी प्रत्येक बूथवर तरुणांचा सक्रिय वावर दखल घेण्यासारखा राहिला. यापूर्वी मतदानाबाबत कुणाशीही न बोलणारे मतदार थेट न आवडणार्‍या उमेदवारांचा पंचनामा करत होते. दुसर्‍या बाजूला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ईर्ष्या दिसली. मात्र कटुता दिसून आली नाही. हातकणंगलेच्या मैदानावर यापूर्वी कधीही लोकसभेची निवडणूक इतक्या चुरशीची झाली नसेल इतकी अटीतटीची झुंज मतदारांमध्येही दिसली. 

पट्टणकोडोली हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव. या गावातील मध्यवस्तीतील कन्या विद्यामंदिर मतदान केंद्रात सकाळी सव्वादहा वाजता मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. 93 वर्षांच्या श्रीमाबाई नावलगे या नातवाच्या खांद्यावर बसून मतदानासाठी आल्या होत्या. ज्येष्ठ असल्याने या आजी चार मिनिटांत मतदान करून गेल्या. साडेदहाच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी या मतदान केंद्राला भेट दिली. पट्टणकोडोलीतील मतदार उघडपणे मतदान कुणाला केलेय हे सांगत होती. पण गुलाल निकालानंतरच लावणार, असे म्हणून भुर्रदिशी पसार होत होती. 

चंदेरीनगरी असणार्‍या हुपरीत मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दीच गर्दी दिसून आली. सकाळी 10 वाजून 39 मिनिटे या वेळेत केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्वच ठिकाणी लांबलचक रांगा लागल्या होत्या. रांगेत महिला आणि ज्येष्ठांची संख्या मोठी होती. येथील बहुतेक मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नव्हते. ही मंडळी निवडणूक केंद्रप्रमुखाशी आम्हाला तुम्हीच ओळखपत्र द्या, म्हणून भांडत होती. काहींनी तर मतदार यादीतील नाव व क्रमांक चिठ्ठीवर लिहून आणले होते. हुपरीत ‘आमचं ठरलंय’ असे तरुणांचे घोळके सांगत असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटून गेले. रेंदाळच्या कुमार विद्यामंदिरात सव्वा अकराच्या सुमारास मतदानासाठी गर्दी कमी परंतु रस्त्यावर चर्चा करणार्‍यांची संख्या मोठी असे चित्र होते. ‘बापू, जा की मतदान करून ये’ असे एकमेकांना सांगत होते. तोपर्यंत मतदान केंद्रात सच्च्या नावाचा कार्यकर्ता भेलकांडत आला. एकच वादा म्हणत ‘सोडणार नाही, डायरेक्ट दिल्लीच गाठतो’, असे म्हणू लागल्याने पोलिसांनी त्याला हटकला. यावेळी तो रागाने बाहेर गेला आणि त्याने खिशातून दारूची बाटली बाहेर काढली. सर्वांना दाखवत ‘ड्राय असू दे नाहीतर फ्राय, माझ्या खिशात ही असते’ म्हणून एका बोळातून पळत सुटला. यावेळी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी या मतदान केंद्राला भेट दिली. त्यामुळे त्यांच्यासमोर पोलिसांचा फौजफाटा जमला. त्यांनी काही सूचना दिल्या आणि ते निघून गेले. 

11 वाजून 31 मिनिटे झाली होती. ऊन वाढलं होतं. पण इचलकरंजीच्या गल्ली-रस्त्यांवर वर्दळ मात्र वाढत होती. मेनरोडवरील दगडी इमारत असलेल्या आदी व्यंकटराव विद्यामंदिरात महिला मतदार उन्हामुळे रांगेतून बाजूला येऊन एका झाडाच्या सावलीत गप्पांचा फड रंगवत बसल्या होत्या. आम्ही ज्यांना मतदान करणार आहोत, तोच इचलकरंजीचा ट्रेंड आहे, असे त्यांनी खुशाल सांगून टाकले. राधाकृष्ण विद्यामंदिरातही अशीच स्थिती दिसून आली. सर्वात जास्त मतदान असणार्‍या व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये बाराच्या सुमारास हाऊसफुल्ल म्हणावी इतकी गर्दी होती. इचलकरंजीच्या राजकीय हवेचा अंदाज घेतला असता ती खूपच गरम दिसली. उघडपणे नेत्यांबद्दलची नाराजी मतदार स्पष्ट सांगत होते. 

शिरोळमधील कन्या विद्यामंदिर मतदान केंद्रात दुपारी तीनच्या सुमारास तुलनेने शुकशुकाट होता. शिरोळ हे हातकणंगले मतदारसंघातील लक्षवेधी गाव. इथे मतदारांशी बोलल्यावर फिफ्टी, फिफ्टी असे सांगण्यात येत होते. जयसिंगपूर काय म्हणतेय, असा अनेकांना प्रश्‍न पडला आहे. कारण इथे मतदारांची संख्या जास्त आहे. येथील आक्‍काताई नरसाप्पा नांद्रेकर केंद्रात दुप्पट उत्साह दिसून आला. विशेषत: तरुणांचा ओघ जास्त दिसला. इथले वातावरण वन वे आहे. कुणाला बी विचारा, असे दोघा कार्यकर्त्यांनी  सांगून टाकले. 

हातकणंगलेकडे सर्वांच्याच नजरा आहेत. कारण या गावाच्या नावावरून मतदारसंघाला नाव देण्यात आले आहे.3 वाजून 57 मिनिटे झाली होती. यावेळी हायवेवरून वाहनांचा ताफा जात होता. उमेदवार व  विद्यमान खा. राजू शेट्टी हे एका वाहनात पुढे बसले होते. रस्त्यातील लोकांना हात करत ते पेठवडगावकडे निघून गेले.  हायवेनजीक श्री रामराव इंगवले हायस्कूल आहे. या इमारतीतील मतदान केंद्राचा डामडौल वेगळाच दिसून आला. कारण हे आदर्श मतदान केंद्र होते. या ठिकाणी मतदारांसाठी रेड कार्पेट अंथरले होते. 

फुलांनी परिसर सजवला होता. मतदारांना ऊन लागू नये यासाठी आवारात शामियाना घालण्यात आला होता. बसण्यासाठी सोफासेट ठेवण्यात आले होते. मतदार हा राजा आहे असे एकूण या वातावरण वाटण्यासारखे होते. इथल्या अनेकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता मतदारांनी आपापली भूमिका सांगून टाकली. काहीजण उघडपणे आता परिवर्तन असे म्हणाले तर काहींनी आमचा जुना गडीच बरा, असे सांगून इथे चुरस आहे हे अप्रत्यक्ष सुचवले. 

पेठवडगावची बाजारपेठ मतदानामुळे आज शांत दिसत होती. साडेचार वाजले होते. त्यामुळे श्री बळवंतराव यादव मराठी हायस्कूल मतदान केंद्राकडे मतदार अक्षरश: धावत येत होते. मतदान चुकू नये यासाठी मतदारांची तळमळ दिसत होती. वडगावचे लीड अख्ख्या तालुक्याला तुटणार नाही असे सांगणारे सात ते आठजण भेटले. मतदान केंद्रावर प्रशासनाने सर्व सुविधा केल्याचे दिसत होती. पाळणाघरात अनेक बालके अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या हवाली करून महिला मतदानाच्या रांगेत उभ्या होत्या. पाळणाघराचे हे चित्र समाधानकारक होते. 

गावागावांत चुरस!

प्रत्येक गावांत चुरस होती. ईर्षा होती. गटबाजी तर ठायीठायी दिसून आली. विद्यमान खा. राजू शेट्टी हॅट्ट्रिक करणार की तुलनेने नवखे असणारे शिवसेनेचे धैर्यशील माने हा गड जिंकणार याचे भाकीत करणे तसे धाडसाचे होईल. परंतु जो निवडून येईल त्याचे मताधिक्य इतके कमी असू शकेल की ही लोकसभेची निवडणूक होती का, असा प्रश्‍न पडू शकेल.