Sun, Jul 12, 2020 22:44होमपेज › Kolhapur › स्टेशनरी दुकानात मतदान नोंदणीचे अर्ज!

स्टेशनरी दुकानात मतदान नोंदणीचे अर्ज!

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:00AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : अनिल देशमुख

मतदार नाव नोंदणी, नाव वगळणी आदींचे अर्ज थेट स्टेशनरीच्या दुकानातच विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार अनेक भागात सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मोफत दिल्या जाणार्‍या या अर्जांच्या झेरॉक्स प्रती काढून त्याची राजरोस विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे भरलेले अर्ज दुकानातच जमा करावे लागत असल्याचेही चित्र आहे. यामुळे आयोगाच्या मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमालाच हारताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या पुनर्रिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याकरिता ‘बीएलओ’ (मतदार केंद्र निहाय अधिकारी) नेमण्यात आले आहेत. त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची खातरजमा करून मतदार याद्या अद्ययावत करायच्या आहेत. नव्याने मतदार नोंदणी करणे, मतदार मयत असल्यास अथवा स्थलांतरित असेल तर त्याचे नाव वगळणे, दुबार नाव असल्यास मतदार यादीत एकच नाव ठेवून अन्य नावे वगळणे, पत्ता, छायाचित्र आदींबाबत दुरुस्ती असल्यास ती करणे आदी कामे बीएलओ यांना मतदारांच्या घरी जाऊन करायची आहेत. याकरिता बीएलओ यांना निवडणूक आयोगाने त्या कारणांबाबतचे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, या मोफत अर्जाऐवजी त्यांच्या झेरॉक्स प्रती पैसे देऊन खरेदी कराव्या लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

निवडणूक कार्यालयातून उपलब्ध होणारे अर्ज सोबत घेऊन घरोघरी फिरण्याऐवजी त्या भागातील एकाद्या स्टेशनरी, झेरॉक्स दुकानातच एक अर्ज देण्यात आला आहे. नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांना या दुकानात पाठवून तेथून त्या अर्जांची प्रत विकत घेण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, भरलेले अर्ज त्याच दुकानात स्वीकारले जात आहेत. यामुळे अर्ज सादर करणार्‍यांना त्याची पोहोच मिळत नाही. सादर केलेले अर्ज गहाळ झाले, खराब झाले, त्यात कोणी खोडसाळपणा केला तर त्याकरिता जबाबदार कोणाला धरायचे? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अनेकवेळा अर्ज देऊन, त्यानुसार मतदार यादीत बदल होत नसल्याचे मतदारांचे अनुभव कमी नाहीत, अशाच कार्यपद्धतीमुळे मतदार यादीतील घोळ होत असल्याची शंका यामुळे उपस्थित होत आहे.

मतदार यादीतील नाव वगळणीसाठी आवश्यक 7 क्रमांकाच्या अर्जांची जिल्ह्यात सुमारे 2 लाखांवर आवश्यकता आहे. मात्र, केवळ 25 हजार अर्ज उपलब्ध झाले होते. उर्वरित अर्जासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी नोंदवण्यात आली आहे. हे अर्ज उपलब्ध होईपर्यंत या अर्जांच्या झेरॉक्स प्रती काढून, त्या नागरिकांना मोफतच द्या, अशा सूचना जिल्हा निवडणूक कार्यालयाने बीएलओना दिल्या होत्या. मात्र, दुकानातच पैसे देऊन हे अर्ज घ्यावे लागत असल्याने या अर्जातही गोलमाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे.