Mon, Jul 06, 2020 05:09होमपेज › Kolhapur › मतदान जनजागृती : जिल्हाधिकारी, आयुक्‍त रॅलीत सहभागी

मतदान जनजागृती : जिल्हाधिकारी, आयुक्‍त रॅलीत सहभागी

Published On: Apr 19 2019 1:49AM | Last Updated: Apr 19 2019 12:16AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

मतदानाचा टक्‍का वाढावा यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. गांधी मैदानातून सुरू झालेल्या रॅलीत जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सायकलवरून सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. 

लोकसभा मतदान 2019 च्या अनुषंगाने जनजागृती होण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक निवडणूक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्‍त विद्यमाने महात्मा गांधी मैदानातून सकाळी आठला सायकल रॅली काढण्यात आली.

रॅली खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका मुख्य इमारत, सीपीआर हॉस्पिटल, दसरा चौक मार्गे बिंदू चौकामध्ये संपली. यावेळी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदारांच्या ओळखीसाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पत्रके जिल्हाधिकारी व आयुक्‍त यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. जिल्ह्यात होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे 23 एप्रिलला मतदान प्रक्रियेत सकारात्मक चित्र दिसेल. जिल्ह्यात शंभर टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा आयुक्‍त डॉ. कलशेट्टी यांनी व्यक्‍त केली. रॅलीत महापालिका कर्मचारी, प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तत्पूर्वी महापालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षकांनी पथनाट्य सादर केले.