Sat, Feb 29, 2020 12:24होमपेज › Kolhapur › सावधान! कुमारी मातांचे प्रमाण वाढतेय

सावधान! कुमारी मातांचे प्रमाण वाढतेय

Published On: Dec 28 2018 1:32PM | Last Updated: Dec 28 2018 1:32PM
कोल्हापूर : प्रिया सरीकर 

किशोरवयाचा उंबरठा...अठराविश्‍व दारिद्य्र... नव्या जमान्याशी समरस होण्याची तीव्र इच्छा आणि चैनींच्या वस्तूंचे आकर्षण या सगळ्या गोष्टींच्या आमिषाला भुलून आपल्या आयुष्याची धूळदाण करणार्‍या ‘कुमारी मातां’च्या समस्येनेही समाजाला सतावले आहे. विशेषत: ग्रामीण भागातून अशी प्रकरणे महिन्याकाठी दोन ते तीन उघड होत आहेत. उघड न होणार्‍या प्रकरणांची संख्या मोठी आहे. ही गंभीर समस्या असून, ग्रामीण भागात अशा प्रकरणांच्या भीतीपोटी अल्पवयातच मुलीच्या लग्‍नाचा घाट घातला जात आहे. यातूनच बालविवाहाची प्रकरणे वाढत चालली आहेत.

शहरातील महिलांसाठी काम करणार्‍या सामाजिक संघटना, चाईल्ड लाईन आणि बालकल्याण समितीपुढे सध्या कुमारी माता प्रकरणांची यादी दरमहा वाढत आहे. अशा पीडित मुलींना बालकल्याण समितीमार्फत मार्गदर्शन केले जाते. एखादे प्रकरण हाताबाहेर गेले असेल तर अशा मुलींना सुधारगृहात ठेवून त्यांचे सुखरुप बाळंतपण करून केवळ मुलीला माघारी पाठवले जाते. आजवर अशी प्रकरणे वर्षातून एक दोन दाखल व्हायची; पण आजकाल दर महिन्याला दोन ते तीन कुमारी मातांची प्रकरणे पुढे येत असल्याचे सामाजिक संस्थांकडून सांगण्यात आले. अनेक प्रकरणात मुली स्वत:च बाजारात मिळणार्‍या गोळ्या घेऊन गर्भपाताच्या वाटेवर जाताना दिसतात; पण याचा दुरगामी परिणाम मुलींच्या आरोग्यावर होतो. शहरात नुकत्याच उघडकीस आलेल्या बालविवाहाच्या प्रकरणांचे कारणही काहीअंशी अशाच समस्येकडे जाते. मोठ्या मुलीचे वर्तन ठीक वाटत नसल्याने हतबल आई-वडिलांनी 17 व्या वर्षांतच तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. लहान मुलगीही त्याच वाटेवर जाईल, अशी भीती वाटल्याने 15 वर्षीय लहान मुलीलाही त्यांनी लग्‍नासाठी तयार केले.

तारुण्यांच्या उबरठ्यावर चांगल्या वाईटाची समज तरुणींकडे असायला हवी. लैंगिक आकर्षणाऐवजी करिअरकडे त्यांनी फोकस केला पाहिजे. अशी अनेक प्रकरणे विधि सेवा प्राधिकरणकडे येताहेत. यात तरुणींची फसवणूक होतेय हे कळण्याचे त्यांचे वय नसते. गेली दोन महिने विधि सेवा प्राधिकरणाने संवाद यात्रेच्या माध्यमातून 20 हजार मुलांशी संवाद साधला. यातून एक कारण पुढे आले आहे की, माणसांच्या गरजा आता अन्‍न, वस्त्र, निवारा, व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुक अशा बनल्या आहेत. तरुणपिढी मोबाईलमुळे बिघडत चालली आहे. मुलींच्या पालकांनीही याबाबात सजगता बाळगणे गरजेचे बनले आहे.     - अ‍ॅड. उमेशचंद्र मोरे, सचिव विधि सेवा प्राधिकरण