Mon, Jul 13, 2020 07:55होमपेज › Kolhapur › मुंगूरवाडीच्या सुपुत्राला ‘आयर्न मॅन’चा किताब

मुंगूरवाडीच्या सुपुत्राला ‘आयर्न मॅन’चा किताब

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 08 2018 11:59PMगडहिंग्लज : आदित्य रेडेकर

ऑस्ट्रिया येथे पार पडलेल्या अत्यंत खडतर अशा वर्ल्ड ट्रायथ्लॉन स्पर्धेत गडहिंग्लज तालुक्यातील मुंगूरवाडी गावच्या डॉ. विजय नारायण कुलकर्णी या पेशाने प्राध्यापक असलेल्या सुपुत्राने विविध प्रकारांत यश संपादन करून ‘आयर्न मॅन’चा किताब प्राप्त करून ऑस्ट्रियात भारताचा तिरंगा फडकाविला. रविवारी (दि. 1) वर्ल्ड ट्रायथ्लॉन कॉर्पोरेशनतर्फे घेतलेल्या 20 व्या स्पर्धेत जगभरातून सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. वयाच्या 44 व्या वर्षीही डॉ. कुलकर्णी यांनी मिळविलेले हे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असेच ठरले आहे.

या स्पर्धेत 3.86 कि. मी. पोहणे, 180.25 कि. मी. सायकलिंग व 42.02 कि. मी. धावणे या तीनही प्रकारांत 17 तासांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन असते. डॉ. कुलकर्णी यांनी तब्बल 182 कि. मी. सायकलिंग, 42 कि. मी. रनिंग व 4.50 कि. मी. पोहणे हे केवळ 15 तास 31 मिनिट 43 सेकंदामध्ये पूर्ण करीत आयर्न मॅनचा किताब पटकाविला.

डॉ. कुलकर्णी यांचे मूळगाव गडहिंग्लज तालुक्यातील मुंगूरवाडी आहे. त्यांचा जन्म बेनाडी (ता. चिक्कोडी) येथे झाला. लहानपणापासून त्यांना पोहणे, धावणे, सायकलिंग यामध्ये त्यांना विशेष रस होता. सायकल भाड्याने घेऊन ते तासन्तास सराव करत. 1990 साली दहावी तर 1992 साली देवचंद कॉलेज येथे सायन्समधून बारावी उत्तीर्ण झाले. 1197 साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज) तसेच सावंतवाडीत एंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर 2002 मध्ये एम.डी. पदवी प्राप्त करून अ‍ॅपल रिसर्च व डायग्नोस्टिक सेंटर येथे दोन वर्ष काम केले. सध्या ते कोल्हापूर मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.