Thu, Aug 06, 2020 03:49होमपेज › Kolhapur › बाप्पांना आज निरोप

बाप्पांना आज निरोप

Published On: Sep 12 2019 1:50AM | Last Updated: Sep 12 2019 1:50AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
दहा दिवसांपूर्वी वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या लाडक्या बाप्पांना गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेरच असल्याने गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी उतरण्यासही वेग आला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी शुक्रवार पेठेतून ब—ह्मपुरीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. याठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी तराफे उपलब्ध करण्यात आले आहेत. इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा याठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

पूरस्थितीमुळे पंचगंगा घाट पाण्याखाली असल्याने विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत होती. मात्र बुधवारपासून पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सायंकाळी कै. संजय गायकवाड यांच्या पुतळ्यासमोरील मार्गावरील पाणी मागे सरकल्याने ब—ह्मपुरीकडे जाणारा रस्ता खुला झाला. यामुळे पंचगंगा नदी घाटावर तराफ्यांच्या माध्यमातून विसर्जन करता येईल, अशी आशा आहे.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न

पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे अर्पण करण्यात येणार्‍या गणेशमूर्ती संकलनाकरिता मंडप उभारण्यात आलेला आहे. सर्व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

800 कर्मचारी व सुसज्ज यंत्रणा

विसर्जन व्यवस्थेसाठी गुरुवारी पवडी विभागाचे 250 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 350 व इतर विभागाचे कर्मचारी, 70 ट्रॅक्टर ट्रॉली, 12 डंपर, 8 जेसीबी, 4 रुग्णवाहिका व 2 पाण्याचे टँकर व विद्युत विभागाकडील 2 बूम अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे

इराणी खणीवर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन जेसीबीची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच इराणी खण व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले असून वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

अग्‍निशमन दल, वैद्यकीय सुविधा

अग्‍निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्‍निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हाईट आर्मीच्या वतीने मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी याठिकाणी डॉक्टरांसह वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

तराफ्यांची व्यवस्था

पंचगंगा नदी घाटावर जाण्याचा मार्ग खुला होण्याची आशा आहे. संजय गायकवाड यांच्या पुतळ्यापासून काही अंतरावरच नियंत्रण कक्ष उभारून याठिकाणी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी स्वयंसेवक विसर्जनासाठी उपलब्ध असणार आहेत.

प्रवाहात न उतरण्याचे आवाहन

बुधवारी रात्री राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी 37 फुटांवर होती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ज्याठिकाणी गणेश विसर्जन होते, त्याठिकाणी विसर्जन करण्यास अडचणीचे ठरणार आहे. भक्‍तांनी किंवा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.