Tue, Aug 04, 2020 22:37होमपेज › Kolhapur › समरजितसिंह घाटगेंच्या मातोश्रींना धमकी

समरजितसिंह घाटगेंच्या मातोश्रींना धमकी

Last Updated: Oct 10 2019 1:17AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
कागल विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी निवडणुकीतून माघार न घेता निवडणूक लढविल्यास मुलगा समरजितसिंह, सून व नातवाच्या जीविताला बरेवाईट करण्याची धमकी अज्ञात व्यक्‍तीने त्यांच्या मातोश्री श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलद्वारे दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (रा. कागल हाऊस, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी अनोळखीविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी  संशयिताचा छडा लावून कठोर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले आहेत. शाहूपुरीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण व सायबर क्राईमचे संयुक्‍त पथक नियुक्‍त करण्यात आले आहे. श्रीमती घाटगे यांच्या मोबाईलवरील सात दिवसांतील कॉल डिटेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू  झाली आहे. प्रकरणाचा लवकरच छडा शक्य आहे, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

शुक्रवारपासून धमकीचे फोन

 कुटुंबीयांना जीवे मारण्याबरोबरच शेतातील पीक जाळण्याची व मुरगूड-शिंदेवाडी येथील बंधारा फोडण्याचाही अनोळखी व्यक्‍तीने मातोश्रींना धमकी दिल्याचे समरजितसिंह  यांनी नमूद केले आहे. शुक्रवारपासून (दि.4) धमकीचे प्रकार वारंवार घडल्याचे असून यामुळे मातोश्रींना जबर मानसिक धक्‍का बसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

माघार घेण्यास सांगा, अन्यथा...

समरजितसिह घाटगे कागल  मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. घाटगे तालुक्यात प्रचारात व्यस्त असताना अनोळखी व्यक्‍तीने  4 ऑक्टोबरला सायंकाळनंतर वेळोवेळी श्रीमती घाटगे यांच्या दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आपले चिरंजिव समरजितसिंह घाटगे अपक्ष  म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांना माघार घेण्यास सांगा, अन्यथा त्यांच्या जीवितास बरेवाईट होईल, शिवाय सुनेसह नातवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशीही धमकी देण्यात आली आहे.

दोषीविरुद्ध कारवाईचे आदेश

समरजितसिंह  यांना दोन दिवसांपूर्वी याबाबत मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. देशमुख यांनी शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना तातडीने तपासाचे आदेश दिले.

तपासाबाबत गोपनीयता

उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मंगळवारी रात्री उशिरा तसेच बुधवारी सकाळी श्रीमती घाटगे यांचा रुग्णालयात जाऊन जबाब घेतला. श्रीमती घाटगे यांच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स मागविण्यात आले. त्याचा अहवालही बुधवारी सकाळी उपलब्ध झाला असून   काहींकडे चौकशी करण्यात आली. 

नंबर्स डिलिट झाल्याने अडचण 

श्रीमती घाटगे यांच्या दोन्हीही मोबाईलमधील इनकमिंग कॉल्स डिलिट झाल्याने नेमके कोणत्या क्रमांकावरून धमकीचे कॉल आले.हे शोधणे अडथळ्याचे ठरत आहे. त्यासाठी सायबर क्राईमसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय घेण्यात येत आहे. सात दिवसातील इनकमिंग कॉलची यादी उपलब्ध झाली असून प्रत्येकाकडे स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे, असेही पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.