Sat, Jul 04, 2020 03:57होमपेज › Kolhapur › यंदा गळीत हंगामात स्थानिक टोळ्याच

यंदा गळीत हंगामात स्थानिक टोळ्याच

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:36AMबानगे : रमेश पाटील

यंदाचा गळीत हंगाम ऑक्टोबरमध्येच सुरू होणार असल्याने आपला ऊस वेळेत जावा, यासाठी यंदा स्थानिक टोळ्या तयार करण्याकडे वाहनधारक व शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. गतसाली बीड, उस्मानाबाद, परभणी, सांगोला या जिल्ह्यांतील ऊसतोड मजुरांनी वाहनधारकांकडून एका टोळी पाठीमागे दहा लाख, प्रत्येकी एका कोयत्याला एक लाख रुपये याप्रमाणे ऊसतोड अ‍ॅडव्हान्स घेऊन वाहनधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यामुळे परजिल्ह्यातील मजुरांना कंटाळून स्थानिक टोळ्या बांधल्या आहेत. 

गतसाली अपुर्‍या ऊसतोड मजुरांचा फटका सर्वाधिक बिद्री कारखान्याला बसला. हा कारखाना चार तालुक्यांत विस्तारला आहे. चार तालुक्यांचा संपूर्ण ऊस या कारखान्याला गळितास आला, तर सुमारे दहा लाख टन ऊस गाळप होऊन जिल्ह्यात नंबर एकचा कारखाना होऊ शकतो. मात्र, गतसाली सुमारे 200 टोळ्या आल्या नसल्याने ऊस गाळपाचे प्रमाण निम्म्यावर आले. अपुर्‍या वाहनांमुळे सभासदांचा ऊस वेळेत उचलला नसल्याने, सभासदांना यंदा सभासद साखर 20 रुपये किलो दराप्रमाणे घ्यावी लागली आहे. बीडच्या ऊसतोड मजुरांना एका कोयत्याप्रमाणे 1 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यापेक्षा स्थानिक ऊसतोड मजुरांना एका खुरप्यामागे फक्‍त 25 हजार अ‍ॅडव्हान्स देऊन वाहनधारकांनी स्थानिक टोळ्या बांधल्या आहेत व अजूनही तसे प्रयत्न सुरू आहेत. 

वेळेत ऊस जाण्यासाठी...

गतसाली बीडच्या ऊसतोड मजुरांना 2 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिला होता. मुकादमाकडून 2 लाख बुडाले असल्याने यंदा स्थानिक टोळी केली असल्याची शिंदेवाडी येथील वाहनमालक एकनाथ विठू शिंदे यांनी सांगितले. तर स्वत:चा ऊस वेळेत जावा व जनावरांसाठी चारा वेळेत मिळावा, यासाठी स्थानिक टोळी करणार असल्याची माहिती सोनगे (ता. कागल) येथील शेतकरी शिवाजी पाटील यांनी दिली.