कोल्हापूर : विजय पाटील
माझ्याकडे काय बघतोस आणि मित्राशी वाद का केलास, अशा फुटकळ कारणांवरून तरुणांची टोळकी एकमेकांविरोधात फुरफुरू लागली आहेत. फुरफुरण्याचे प्रकार आता खुनापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. अशा टोळक्यांना आता आवरायला हवे; अन्यथा रक्तरंजित दहशतीचा खेळ सुरू व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी पेठेत नुकताच झालेला तरुणाचा खून याच अतिरेकी कारणांचा परिपाक आहे. अशा तरुणांवर कुणाचाच दबाव नसल्याचे स्पष्ट आहे.
बघून घेतो, सोडत नाही, अशी भाषा त्यांच्या तोंडी सहज दिसते. शाळा, कॉलेजच्या कॅम्पसवर ही भाषा आता रुजत चालली आहे. कॉलेज कॅम्पसवर प्रत्येक टोळक्याच्या उभारण्याच्या जागा ठरलेल्या आहेत. या जागेवर दुसरा कोणी उभा राहिला, तर मारामारी ठरलेली आहे. कुणी कुणाकडे सहज बघायचेसुद्धा नाही. कारण, कुणी नजरेला नजर दिली, तर खुन्नस देतोय म्हणत त्याचा पाठलाग करून दहा-पंधराजण लोळवणार, हे नक्की.
धड शिकायचं नाही आणि कसला कामधंदाही करायचा नाही. नुसतं चिडायचं, गुरगुरायचं. घरातही ही मंडळी रागाने सतत फणा काढतात. शहाण्यासारखं वाग, असं आई-वडिलांनी म्हटलं, तरी त्यांच्यावरच शिव्यांचा पाऊस पाडायचा. नातेवाइकांनी सल्ला दिला, तर त्यांच्यावर उखडायचं. टोळकी करायची आणि नुसतं हुंदडायचं हा एककलमी कार्यक्रम आता काही तरुणांत सुरू आहे. हे धोकादायक आहे.
कोल्हापूरचं वैशिष्ट्य असं की, इथं ज्येष्ठांना मानसन्मान देण्याची अजूनही पद्धत आहे. वाडवडिलांच्या शब्दाला जपणारी संस्कृती इथं रुजली आहे. त्यामुळेच जुन्याजाणत्यांचा दबाव पेठ, गल्ली, चौकात दिसत होता; पण आता तरुणाईच्या बदलत चाललेल्या जीवनपद्धतीमुळे ही आदराची संस्कृतीच कालबाह्य ठरू लागली आहे. कुणालाच जुमानायचं नाही, असं वर्तन बहुतेक तरुणांकडून सुरू झालं आहे. एवढा कसला राग येतोय रे तुला, असे दररोज घराघरांत मोठ्यांकडून लहानग्यांना दटावले जात असल्याचे चित्र आहे.
सामाजिक दबाव हाच उपाय
पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्यायला हवे. त्यांच्या मित्रांची संगत तपासायला हवी. गल्ली-पेठ, गावांमधील ज्येष्ठ, मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन चुकीच्या गोष्टींना चाप लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पोलिसांनीही कॉलेज, शाळांच्या कॅम्पसबाहेरील रोडरोमिओंना, टोळक्यांना कायद्याचा धाक दाखवायला हवा. तरच या गोष्टींना आळा बसेल या घटना घडू नयेत, यासाठी सामाजिक दबाव हाच जालीम उपाय आहे.