Tue, Sep 22, 2020 10:16होमपेज › Kolhapur › भारतासह जग कोरोना ‘व्हॅक्सिन’च्या वळणावर!

भारतासह जग कोरोना ‘व्हॅक्सिन’च्या वळणावर!

Last Updated: Jul 14 2020 1:56AM
कोल्हापूर : पुढारी डेस्क
‘कोव्हिड 19 व्हॅक्सिन ट्रॅकर’च्या मते जगभरातील विविध औषध कंपन्या तसेच संशोधन संस्था मिळून 150 वर प्रकल्प कोरोना विषाणूवर व्हॅक्सिन बनविण्यात गुंतलेले आहेत. जर्मन असोसिएशन ऑफ रिसर्च बेस्ड फार्मास्युटिकल कंपनीज्च्या माहितीनुसार जगभरात 115 प्रकल्प सध्या सुरू आहेत, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ही संख्या किमान 102 आहे. 
‘इंतेहा हो गयी इंतेजार की...’
इथे व्हॅक्सिन तयार होते आहे. तिथे शोध लागला. भारतातही व्हॅक्सिन तयार झाली. चाचणी यशस्वी झाली. या प्रकारच्या बातम्यांना सगळेच कंटाळले आहेत. सगळ्यांचीच ‘प्रतीक्षा क्षमता’ संपुष्ठात आली आहे. कधी एकदा व्हॅक्सिन थेट माझ्यापर्यंत येते, असे सगळ्यांनाच झाले आहे. व्हॅक्सिन तयार आहे. एका प्रकारच्या नव्हे तर अनेक प्रकारच्या... तर एकूणच ‘व्हॅक्सिनायन’ही जाणून घ्या आणि व्हॅक्सिनचे आगमन कधी होईल तेही...

चाचणीचे हे टप्पे

 व्हॅक्सिनवर आधी प्रयोगशाळेत चाचणी घेतली जाते. 
 नंतर जनावरांवर त्याची चाचणी घेतली जाते.
 वेगवेगळ्या टप्प्यात लोकांवर चाचणी घेतली जाते.
 मग वापर सुरक्षित आहे की नाही यावर संशोधन होते.
 शरीराची रोगप्रतिबंधक शक्‍ती वाढली का ते तपासले जाते.
 हे सगळे झाल्यानंतर पुरेशा प्रमाणात ती उत्पादित करण्याचे आव्हान असते. 

व्हायरस-व्हॅक्सिनचे हे नाते

 कुठलाही व्हायरस जिवंत नसतो. शरीरात शिरल्यावर तो जिवंत होतो आणि स्वत:ची संख्या द्रूतगतीने वाढवतो. कोशिकांना संपवतो.
 शरीरात व्हायरस दाखल झाला की, त्याच्याशी लढू शकणार्‍या अँटिबॉडी शरीर तयार करते. या अँटिबॉडी जिंकल्या तर आपण बरे होतो आणि त्या हरल्या तर विषाणूचा विजय होतो. व्हॅक्सिन नेमके शरीराच्या रोगप्रतिबंधक तंत्राला सक्रिय करते आणि आजार होऊ देत नाही. 
 

भारतातील परिस्थिती काय?
या क्षणापर्यंत बाजारात कोरोनावर कुठलेही व्हॅक्सिन उपलब्ध नाही. जर्मनीत व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. ही एम-आरएनए व्हॅक्सिन आहे. भारतातही ‘भारत बायोटेक’च्या व्हॅक्सिनला पहिल्या टप्प्याची मंजुरी मिळाली. चाचणीही झाली. कंपनी व संशोधनात संलग्न संस्थांनी चाचणी यशस्वी ठरल्याचा दावा केला. 15 ऑगस्टपर्यंत ती बाजारात आणून कोंडलेल्या बाजारालाही स्वातंत्र्य मिळेल, असेही सांगण्यात आले... पण सरकारने यात घाई उपयोगाची नाही, अशी भूमिका घेतली आहे. चाचणीचे संपूर्ण टप्पे प्रचलित पद्धतीशी फार तडजोड न करता पार पाडले गेल्यावरच ही लस बाजारात येणार आहे.  

पुढे काय? तर...पुढच्या वर्षी लवकर या!
सगळ्यांनीच व्हॅक्सिनसाठी प्रयत्नांची शिकस्त चालविली आहे. चाचण्या यशस्वितेचा दावाही केला आहे; पण व्हॅक्सिन विकसित होऊन सगळे टप्पे पार पाडल्यानंतर बाजारात प्रत्यक्ष उपलब्ध व्हायला 2021 उजाडावे लागणार आहे.

चीनमध्ये मर्यादित वापर सुरू
चीनमधील कॅन्सिनो बायोलॉजिकल व बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेकच्या संयुक्‍त विद्यमाने व्हॅक्सिन तयार झाली असून, या व्हॅक्सिनने चाचणीचे सर्व टप्पे पार पाडले असून, तिला मर्यादित वापरासाठी मान्यताही मिळाली आहे.

सर्व चाचण्या यशस्वी; रशियाचा दावा
रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सिन तयार केल्याचा दावा केला आहे. सर्व परीक्षणेही पार पडल्याचे व्हॅक्सिन तयार करणार्‍या सेचेनोव्ह विद्यापीठाने म्हटले आहे. 

अमेरिकेच्या मॉडर्नाचीही घोषणा  
अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने आपल्या व्हॅक्सिनचे अखेरचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून, 30 हजार जणांना कोरोना व्हायरस व्हॅक्सिन देण्याची ही योजना आहे.

 "