Thu, Feb 27, 2020 21:58होमपेज › Kolhapur › तलाठ्यांच्या ‘लॅपटॉप’चा मार्ग मोकळा

तलाठ्यांच्या ‘लॅपटॉप’चा मार्ग मोकळा

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:23PMकोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचा महिती व तंत्रज्ञान विभागाकडे अडकलेले 1 कोटी 35 लाख रुपये सुमारे वर्षभरानंतर परत मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिनाअखेरपर्यंत तलाठ्यांच्या हातात नवे लॅपटॉप दिसणार आहेत.

सात-बारा उतारे ऑनलाईन करण्यात आले आहेत. यामुळे तलाठ्यांना शासनाच्या वतीने लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लॅपटॉप खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून 1 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद गेल्या वर्षी केली होती. हे पैसेही वर्ग करण्यात आले होते. मात्र, जिल्हा पातळीवर लॅपटॉप खरेदी करण्याऐवजी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने लॅपटॉप घेण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार या विभागाला जिल्ह्याच्या लॅपटॉपसाठी पैसे वर्गही केले.

राज्य पातळीवर मोठ्या संख्येने लॅपटॉप खरेदी होणार असल्याने त्याच्या किमती कमी होणे अपेक्षित होते. मात्र, झाले उलटेच, माहिती व तंत्रज्ञान विभागाने लॅपटॉपची किंमत अधिक असल्याचे सांगत जादाचे पैसे भरण्यास जिल्हा प्रशासनाला सांगितले. जादा दराने लॅपटॉप खरेदी करणे शक्य नसल्याने जिल्हा प्रशासनाने लॅपटॉपचे पैसे परत मागवले. मात्र, वर्ष उलटत आले तरी हे पैसे जिल्हा प्रशासनाला मिळत नव्हते. याबाबत प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर  माहिती व तंत्रज्ञान विभागाने 1 कोटी 35 लाख रुपये जिल्हा प्रशासनाला परत दिले. पैसे परत आल्याने लॅपटॉप खरेदीची जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्ह्यातील 543 तलाठ्यांसाठी लॅपटॉपची खरेदी केली जाणार आहे. याकरिता अधिकची 68 लाख रुपयांची रक्‍कम जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या सात-बारा ऑनलाईन कामासाठी तलाठी स्वत:चा लॅपटॉप वापरत आहेत. अनेकांचे लॅपटॉप खराब झाले आहेत, त्यावर काम करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे. काहींनी स्वत: नवे लॅपटॉपही खरेदी केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे मात्र, तलाठ्यांना लवकरच शासनाचे लॅपटॉप मिळणार आहेत.