Sun, May 31, 2020 10:32होमपेज › Kolhapur › संक्रांतीचे वाण झाले इको-फ्रेंडली अन् हायटेक

संक्रांतीचे वाण झाले इको-फ्रेंडली अन् हायटेक

Last Updated: Jan 14 2020 1:02AM
कोल्हापूर : प्रिया सरीकर

संक्रांतीचा सण म्हणजे महिलांच्या आनंदाला उधाण. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने मैत्रिणींना भेटण्याची आणि गुजगोष्टी करण्याची आयती संधी. त्यामुळे रथसप्तमीपर्यंतचा काळ हा महिलांसाठी आनंदाचा काळ असतो. काळानुरूप हळदी-कुंकवाचे ठिकाण आणि वाणही  बदलले आहे. वाण म्हणून दिल्या जाणार्‍या वस्तू इको-फ्रेंडली आणि हायटेक झाल्या आहेत. फुलांचे रोप, तुळस, झाडे लावण्यासाठी प्लास्टिक बकेट, कापडी पिशवी, पुस्तक, गृहसजावटीच्या वस्तू,  मोबाईल कव्हर, कार्ड पाऊच पासून ऑफिसला जाणार्‍या महिलांना उपयोगी पडतील अशा वस्तू वाण म्हणून भेट देत आहेत. 

संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने घरी येणार्‍या सुवासनींची बोरा गजराने ओटी भरून त्यांना वाण देण्याची प्रथा आहे. पूर्वी वाण म्हणून महिलांना स्वयंपाक घरात  उपयोगी पडतील अशा वस्तू दिल्या जात होत्या. चमचा, वाटी, गाळणी, रूमाल, हळदी-कुंकवाची डबी, फणी, कंगवा, आरसा हे सगळे दिले जात होते. सध्या मात्र ही प्रथा फारच बदलून गेली आहे. अनेक मैत्रिणींनी आता हळदी-कुंकवाच्या स्वरूपात बदल केला आहे. महिलांच्या सध्याच्या समस्या जाणून पर्यावरणपूरक पर्याय वाण देण्यासाठी महिलांनी निवडला आहे. 

अनेक घरांत हळदी-कुंकवाला येणार्‍या महिलांना तुळशीची रोपे, फुलझाडांची रोपे, कापडी ग्रो बॅग्ज, कापडी पिशव्या, आरोग्य टिप्स, स्वयंपाक टिप्स देणारी लहान पुस्तके, गृहसजावटीच्या हँडमेड वस्तू, कापडी मोबाईल कव्हर, एटीएम कार्ड आदी ठेवण्यासाठीची कापडी पाकिटे यांचा वापर केला जाऊ लागला आहे. जाणीवपूर्वक प्लास्टिक वस्तू टाळून वाण देण्यासाठी वस्तू निवडल्या जात आहेत. त्यालाही मागणी वाढत आहे. सर्वसामान्य घरात आजही स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या वस्तूच वाण म्हणून दिल्या जातात. अनेक घरांत देवघरात वापरल्या जाणार्‍या सिल्व्हर कोटेड वस्तूही वाण म्हणून दिल्या जातात.

उद्यानातील हळदी-कुंकूला पसंती

महिला, मैत्रिणींचे ग्रुप आता मिळून संक्रांतीचे हळदी-कुंकू करू लागल्या आहेत. उदा. मैत्रिणींपैकी प्रत्येकीच्या घरी जाणे-येणे तिला घरात एकट्याने करावा लागणारा खर्च हे सगळे करण्यापेक्षा दोघी किंवा तिघींमध्ये मिळून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आखला जातो. एखादीच्या घरी जमण्याऐवजी सर्वांना सोयीस्कर ठरेल असे शहरातील उद्यान निवडून याठिकाणी हळदी-कुंकू करतात. यामुळे महिलांना उद्यानात जाण्याची आणि मनमुराद हसत-खेळत हळदी-कुंकू करण्याची संधी मिळते.  हळदी-कुंकवाला येणारा खर्च वाटून करणे सोयीस्कर ठरत असल्याने हा प्रकार आम्हाला आवडू लागला आहे, असे वसुंधरा ग्रुपच्या सुप्रिया भस्मे यांनी सांगितले.