Wed, Jul 08, 2020 16:34होमपेज › Kolhapur › संभापूर फाटा बनलाय मृत्यूचा सापळा

संभापूर फाटा बनलाय मृत्यूचा सापळा

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:45PMटोप : आर. एस. पाटील 

हातकणंगले तालुक्यातील संभापूरमधील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने एक तर जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे किंवा सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या टोपमधील वडगाव फाट्यावर असणार्‍या बोगद्यातून उलट्या बाजूने पलीकडे जावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याही बाजूने गेले तरी पुढे धोका आहेच. त्यामुळे महामार्ग सहापदरी करताना तरी संभापूर फाट्यावर भुयारी मार्ग व्हावा, अशी मागणी संभापूरवासीय करीत आहेत.

संभापूर हे हातकणंगले तालुक्यातील महामार्गाच्या पूर्वेला वसलेले गाव असून जुन्या पुणे-बंगळूर महामार्गावर संभापूर फाटा हा महामार्गावरील एक थांबा होता. त्याठिकाणी एस.टी. बस व इतर वाहने थांबत होती. त्याचा फायदा संभापूर व शेजारच्या पूर्वेकडील गावांतील नागरिकांना देखील होत होता. महामार्गाचे चौपदरीकरण झाले आणि संभापूर फाट्यावर कोणतेही वाहन थांबणे जवळजवळ बंदच झाले. महामार्गाच्या अलीकडे व पलीकडे नागरिकांना जाणे अशक्य बनले आहे. चौपदरीकरणात संभापूर फाट्यावर रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक किंवा भुयारी मार्ग अशी कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे संभापुरातील नागरिकांना रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण बनले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहने अत्यंत वेगाने जात असल्यामुळे रस्ता पार करणे जीवावर बेतणारे ठरत आहे.  

संभापूरमधील अनेकांची शेतजमीन महामार्गाच्या पश्‍चिमेला आहे. त्या शेतकर्‍यांना शेतातमध्ये जायचे झाल्यास सध्या कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे शेतातील कामासाठी पलीकडे जायचे जरी झाले तर जीव धोक्यात घालून वाहनांचा अंदाज घेत महामार्ग ओलांडावा लागतो. त्यात थोडीशी जरी गफलत झाली तरी अपघात ठरलेलाच. दुसरा पर्याय वापरायचा म्हटले तर तोही अगदीच सुरक्षित नाही. त्यासाठी संभापूर गावच्या बसथांब्यापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगांवकडे येणार्‍या वाहनांसाठी असणार्‍या भुयारी मार्गात उलट्या दिशेने शिरून सेवा रस्त्याने फिरून यावे लागते. या मार्गावर वडगावकडे येणारी वाहने वेगात असतात. त्यात संभापूरकडून जाऊन उलट दिशेने घुसताना अपघाताचीच शक्यता नाकारता येत नाही. अशा दुहेरी कचाट्यात संभापूरवासीय सापडले आहेत. संभापूर हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणार्‍या उद्योगात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महामार्ग सहापदरी करताना प्राधान्याने येथील समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे. 

पाठपुरावा करणार : झिरंगे 

रस्ते विकास महामंडळाकडे संभापूर फाट्यावर ओपनिंग अथवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी पाठपुरावा केला आहे. सहापदरीकरणादरम्यान हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संभापूरचे सरपंच प्रकाश विष्णू झिरंगे यांनी दिली.