Fri, Jul 10, 2020 18:50होमपेज › Kolhapur › राज्य पूरमुक्‍त, दुष्काळमुक्‍त करणार

राज्य पूरमुक्‍त, दुष्काळमुक्‍त करणार

Published On: Sep 17 2019 1:51AM | Last Updated: Sep 17 2019 1:51AM

इचलकरंजी : जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, माजी खासदार धनंजय महाडिक आदी.इचलकरंजी : प्रतिनिधी
महाराष्ट्रात एकीकडे कोल्हापूर, सांगली, सातारासारखे जिल्हे पाण्याखाली आणि दुसरीकडे पाण्यासाठी वणवण असे विदारक चित्र यंदाच्या महापुरात पाहावयास मिळाले. यापुढे अतिवृष्टी झाली तरी पूर येणार नाही, पुरामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही; त्याचबरोबर दुष्काळी भागही सुजलाम सुफलाम होईल, असा प्रकल्प राबवण्याचा निर्धार भाजप-सेना सरकारने केला असून या प्रकल्पाला जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेने तत्त्वत: मान्यता दिली आहे. सात वर्षांत महाराष्ट्र पूरमुक्‍त व दुष्काळमुक्‍त करणार, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने इचलकरंजीत जाहीर सभेत बोलताना व्यक्‍त केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचे आज इचलकरंजीत अभूतपूर्व असे जल्‍लोषी स्वागत करण्यात आले. इचलकरंजीत जागोजागी झालेल्या जोरदार स्वागतामुळे मुख्यमंत्र्यांची यात्रा तब्बल दोन तास शहरातून फिरल्यानंतर ती थोरात चौकातील सभास्थळी आली. तेथे जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत अभूतपूर्व अशी वृष्टी झाली. जगात सर्वाधिक वृष्टी महाबळेश्‍वर येथे नोंदवण्यात आली. इतका प्रचंड पाऊस या तीन जिल्ह्यांत झाला. या भागात पुराने अक्षरश: थैमान घातले. या महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार सरकारने केला. एकीकडे जिल्हेच्या जिल्हे बुडतात; तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते, असे विदारक चित्र राज्यात पाहावयास मिळाले. त्यामुळे सरकारने हा प्रकल्प राबवण्यासाठी जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या  22 तज्ज्ञांची समिती पूरग्रस्त भागात पाठवली होती. जागतिक बँकेच्या सहकार्याने पूरग्रस्त भागातील पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात येणार आहेत. पूर आलाच तर रस्ते बुडणार नाहीत, वीज पुरवठा ठप्प होणार नाही, पाण्याच्या योजना बुडून पाणी पुरवठा ठप्प होणार नाही, अशी व्यवस्था या  प्रकल्पाच्या माध्यमातून उभी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध— प्रदेश यांच्या वाट्याला जितके पाणी आहे, त्यापेक्षा जास्त पाणी धरणातून वाहून गेले. हेच पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा अभिनव प्रकल्प राबवण्याचा संकल्प सरकारने केला आहे. या प्रकल्पाची जागतिक बँकेच्या तज्ज्ञांच्या पथकाने प्रशंसा केली आहे. या प्रकल्पाला जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेने तत्त्वत: मान्यता दिली आहे. या प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच ते सात वर्षांचा कालावधी लागणार आहे. पण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील सतत पुराच्या छायेत असणारा भाग पूरमुक्‍त तर अनेक दशके दुष्काळाशी झुंज देणारा मराठवाडा, विदर्भसारखा भाग दुष्काळमुक्‍त होईल.

गेल्या पाच वर्षांतील सरकारच्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या मागील 15 वर्षांच्या कारभारावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, मराठा, धनगर, ओबीसी अशा सर्व वर्गांचा विकास करताना त्यांचे प्रश्‍न संघर्षाशिवाय सुटतील अशी व्यवस्था केली. मागील पाच वर्षांत जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न सरकारने केला. या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील दु:ख संपले असे नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादी राजवटीच्या पंधरा वर्षांच्या कारभाराचा आणि आमच्या सरकारच्या मागील पाच वर्षांतील कारभाराचा लेखाजोखा मांडा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. पंधरा वर्षांतील कारभारापेक्षा पाच वर्षांत दुप्पट कामे केले नसेल तर मते मागायला येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे हाच सरकारचा अजेंडा राहिला असून यापुढेही हे कार्य अखंडितपणे करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकर्‍यांच्यामागे सरकार खंबीरपणे उभे 

सरकार मागील पाच वर्षांत शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. दुष्काळ, अतिवृष्टी, अवर्षण, लष्करी अळी अशा संकटाच्या काळात शेतकर्‍यांच्या खात्यावर मागील पाच वर्षांत 50 हजार कोटी वर्ग करण्यात आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीने पंधरा वर्षांच्या कारभारात शेतकर्‍यांच्या खात्यावर 20 हजार कोटी वर्ग केले. वर्षाला शेतकर्‍यांना दहा हजार कोटींची मदत देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

मोदी सरकारने एकाही घटकाला वंचित ठेवले नाही ः चंद्रकांत पाटील

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मोदी सरकारने समाजातील एकाही घटकाला वंचित ठेवले नाही. प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या काळात एकही दंगल झाली नाही. पोलिसांच्या बंदुकीतून एक गोळीही सुटली नाही. राज्याला दूरदृष्टी असणारे आणि समर्थ नेतृत्व मिळाले आहे. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे रेकॉर्डही ते तोडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सुरेश हाळवणकर विजयी होतील आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे सांगण्यासाठी आता भविष्यवाणीची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी राजवटीचे श्राद्ध घातले ः आ. हाळवणकर

आमदार हाळवणकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर हे पेशवाई व उच्चभू—चे राज्य असून त्यांना केवळ पूजा-अर्चाच जमते, असा आरोप विरोधकांनी केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे श्राद्ध घातले. समाजातील जाती-भेदाच्या भिंती पाडून एकसंध राज्य निर्माण केले. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांनी इतिहास घडवला. तीर्थक्षेत्राचा विकास केला. कोल्हापूरला एअरपोर्ट दिले. आता कोल्हापूरला खंडपीठ दिल्यास विकासाचे वर्तुळ पूर्ण होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.
महापुराच्या प्रलयात इचलकरंजी आणि चंदूरसाठी मुख्यमंत्र्यांनी 20 कोटी रुपयांचा निधी दिला. पूरग्रस्तांसाठी तीन महिने पुरतील यासाठी धान्याची गोदामे खुली केली. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी 150 कोटी रुपयांचा निधी दिला. राज्य सरकारने 2022 साठी टेक्स्टाईल पॉलिसी तयार केली. मात्र वित्त विभागाकडून एक चूक झाली. अत्याधुनिक यंत्रमागासाठी केवळ 40 पैशांचीच सवलत मिळाली. त्यांचा प्रश्न निकालात काढण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ वस्त्रोद्योगासाठी ‘सुवर्णकाळ’ असणार आहे. महाराष्ट्राचा जनादेश मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याची खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली. 

यावेळी अशोक स्वामी, अजित जाधव, मिश्रीलाल जाजू, अनिल डाळ्या, ऋषभ जैन, पुंडलिक जाधव, प्रसाद खोबरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. 

कार्यक्रमास माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार भरमू पाटील, बाबा देसाई, रजनीताई मगूदम, रमेश रेडेकर, अरुण इंगवले, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा सौ. नीता माने, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, हुपरीच्या नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठ आदी उपस्थित होते. 

‘ईव्हीएम’वर आरोप करणारे बुद्धू 

2004 ते 2014 पर्यंतच्या निवडणुका ईव्हीएमद्वारेच घेण्यात आल्या. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना ईव्हीएममध्ये खोट दिसली नाही. आता मोदींच्या झंझावाताने देशात सर्वत्र भाजपची लाट आल्याने विरोधकांना धोबीपछाड मिळाली आहे. बुद्धू मुलाला परीक्षेत भोपळा मिळाल्यानंतर तो ‘मी मेरीटमध्येच येणार होतो; पण माझा पेन नालायक निघाला’, असे म्हणतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितांत हशा पिकला.

मुख्यमंत्री म्हणाले...

    जागतिक बँक, एशियन बँकांचे अर्थसहाय्य 
    आघाडीच्या 15 वर्षांतील कामापेक्षा दुप्पट कामे 
    प्रत्येक समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे हा अजेंडा
    शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणाने उभे