Sun, Jul 12, 2020 19:29होमपेज › Kolhapur › अंतर्गत दुफळीमुळे बालेकिल्ल्यातच सत्तेपासून पोरकी; शिवसेना-भाजपला उभारी

जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 26 2019 12:42AM
कोल्हापूर ः सतीश सरीकर 

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पक्षवाढीपेक्षा एकमेकांची जिरवण्यातच दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी धन्यता मानली. त्याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत होऊन दोन्ही पक्ष पार रसातळाला गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत दुफळीमुळे जिल्ह्यात शिवसेना-भाजपला उभारी मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला. अपवाद वगळता विधानसभा, लोकसभेत काँग्रेसचेच बहुतांश आमदार-खासदार. जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरही काँग्रेसचेच प्राबल्य. 1999 च्या सुमारास काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर जिल्ह्यातील सत्ता या दोन्ही पक्षांत वाटून गेली. गेली अनेक वर्षे दोन्ही पक्षांतच जिल्ह्यातील पदे विभागली होती. कालांतराने सत्तेतील वर्चस्ववादातून वरचढ ठरण्यासाठी नेत्यांतच एकमेकांत मोठ्या प्रमाणात ईर्षा निर्माण झाली. 

जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले गेले आहे. या सहकाराच्या माध्यमातूनच काँग्रेस घरोघरी पोहोचली होती. शेकाप व जनता दल, इतर डावे पक्ष हेच काँग्रेसचे विरोधक होते. या पक्षांच्या हातात थोडीफार सत्ता होती; परंतु संपूर्ण जिल्ह्यावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. त्याला कारणही तसेच होते. तत्कालीन ठरावीक नेतेमंडळी स्वहितापेक्षा पक्ष निष्ठेला महत्त्व देत होती. त्यामुळे काही प्रमाणात जिल्ह्यात काँग्रेस वाढत गेली. 2000 सालापर्यंत जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसच्या सत्तेला एकेक करत सुरुंग लागत गेला. सत्तेची समीकरणेही बदलत गेली. तरीही बहुतांश संस्था काँग्रेस-राष्ट्रवादीच ताब्यात होत्या. मात्र, कुरघोडीच्या राजकारणातून विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही वर्षांत सुरू झालेल्या पाडापाडीच्या राजकारणामुळे सद्यःस्थितीत काँग्रेसचे अस्तित्व फक्‍त पक्षापुरतेच मर्यादित राहिले आहे. 

1971 पासून एकवेळचा अपवाद वगळता कायम काँग्रेस-राष्ट्रवादीनेच इचलकरंजी व कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर वर्चस्व राखले आहे. 1971 ला इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून दत्तात्रय कदम (काँग्रेस) व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राजाराम निंबाळकर (काँग्रेस) विजयी झाले. 1977 ला अनुक्रमे बाळासाहेब माने (काँग्रेस) व दाजीबा देसाई (शेकाप) हे विजयी झाले होते. देसाई यांनी अवघ्या 165 मतांनी काँग्रेसच्या माने यांचा पराभव केला होता. 1980 ला इचलकरंजीमधून बाळासाहेब माने व कोल्हापूरमधून उदयसिंगराव गायकवाड यांनी विजय मिळविला. 1984, 1989, 1991 असे सलग माने व गायकवाड या दोघांनी पुन्हा विजयाची हॅट्ट्रिक केली. 1996 ला इचलकरंजीमधून कल्लाप्पा आवाडे व कोल्हापूरमधून गायकवाड विजयी झाले. 1998 ला पुन्हा आवाडे, तर कोल्हापूरमधून सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस) यांनी विजयी परंपरा राखली. 

1999 ला  राष्ट्रवादीची स्थापना झाली. यावेळी इचलकरंजीमधून श्रीमती निवेदीता माने (राष्ट्रवादी) व मंडलिक (काँग्रेस) यांनी विजय मिळविला. 2004 पुन्हा माने व मंडलिक हे विजयी झाले. परंतू दोघेही राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडूण आले. 2009 ला इचलकरंजीतून माने यांचा पराभव करून स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी विजयी झाले. कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे मंडलिक यांनी अपक्ष लढत देऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चितपट केले. 2014 मध्ये इचलकरंजीमधून शेट्टी व कोल्हापूरमधून धनंजय महाडीक (राष्ट्रवादी) विजयी झाले. 

कोल्हापूर जिल्ह्यात 1972 ला 11 विधानसभा मतदारसंघ होते. त्यापैकी तब्बल 9 मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. एक अपक्ष व एक शेकापचे आमदार होते. 1978 ला 12 मतदारसंघ झाले. त्यावेळी मात्र काँग्रेसला थोडाफार फटका बसला. काँग्रेस 7, जनता पक्ष 2, अपक्ष 2 व कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाली होती. 1980 ला दहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने प्राबल्य मिळविले. शेकाप व अपक्ष असे प्रत्येकाला एक जागा मिळाली. 1985 मध्ये काँग्रेसला 8, शेकाप 2, जनता दल 1 व अपक्ष 1 निवडूण आले. 1990 मध्ये  काँग्रेस 7, जनता दल 2, माकप 1 निवडूण आले. 1990 मध्ये शिवसेनेने कोल्हापूर व शाहुवाडी या दोन मतदारसंघात विजय मिळवून विधानसभेत खाते उघडले. 1995 ला काँग्रेस 7 जागावर विजयी झाली. 3 ठिकाणी अपक्ष आणि शेकाप व शिवसेना यांनी प्रत्येकी एक जागा मिळविली. 1999 ला काँग्रेसने 10 जागा पटकावल्या. शिवसेना व शेकापला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले.

2000 सालापासून जिल्ह्यातील काँग्रेसला उतरती कळा लागली. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या 3, राष्ट्रवादी 2 च्या दोन जागा निवडूण आल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाने 3, अपक्ष 3 व शिवसेना एका जागेवर विजयी झाली. 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघ पुर्नरचनेत जिल्ह्यात 10 मतदारसंघ निर्माण झाले. या निवडणूकीत काँग्रेसला अवघ्या 2 तर राष्ट्रवादीला 3 जागावर समाधान मानावे लागले. शिवसेनेने 3 जागा पटकावल्या. जनसुराज्य व भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. 2014 च्या निवडणूकीत जिल्ह्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. एवढी नामुष्की काँग्रेसवर ओढविली. राष्ट्रवादीला कशाबशा 2 जागांवर विजय मिळाल्या. शिवसेनेने जिल्ह्यात मुसंडी मारत तब्बल 6 जागांवर कब्जा केला. भाजपला 2 जागा मिळाल्या. 

काँग्रेसचे आतापर्यंतचे जिल्हाध्यक्ष -

रत्नाप्पाण्णा कुंभार (1948 ते 1955), दिनकरराव मुद्राळे (1955 ते 1958), महादेव श्रेष्ठी (1958 ते 1959), शंकरराव माने (1959 ते 1962), बाबासाहेब खंजिरे (1962 ते 1964), व्ही. के. चव्हाण-पाटील (1965 ते 1967), उदयसिंगराव गायकवाड (1968 ते 1971), हिंदुराव पाटील (1972), अनंतराव भिडे (1972 ते 1978), बाळासाहेब माने (1978 ते 1979), एस. आर. पाटील (1979 ते 1981), बाबुराव धारवाडे (1981 ते 1989), शामराव भिवाजी पाटील (1989), शंकरराव पाटील-कौलवकर (1993), बाबासाहेब कुपेकर (1997), पी. एन. पाटील (1999 ते 2018) प्रकाश आवाडे (2018 पासून). 
राष्ट्रवादीचे आतापर्यंतचे जिल्हाध्यक्ष - बाबा कुपेकर, के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, लेमनराव निकम, मानसिंगराव गायकवाड, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील असे जिल्हाध्यक्ष झाले आहेत.     

पक्षवाढीसाठी प्रयत्न न झाल्याने काँग्रेसची अवस्था दयनीय...

गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये वर्चस्वाचे राजकारण सुरू झाले आहे. पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीच्या राजकारणातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे काँग्रेसला घरघर लागली आहे. एकसंध काँग्रेस आता गटातटात विभागल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांत जिल्ह्यात पक्षवाढीसाठी म्हणावे तितके प्रयत्नच झाले नाहीत. त्यामुळेच सध्या काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीचीही हीच स्थिती आहे. त्याविरुद्ध शिवसेना व भाजप राजकीय खेळी करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काँग्रेसचा बालेकिल्ला शिवसेना-भाजपच्या ताब्यात गेल्याचे वास्तव आहे.