Thu, Jul 02, 2020 12:07होमपेज › Kolhapur › मनपात नियोजनाचा ‘दुष्काळ’

मनपात नियोजनाचा ‘दुष्काळ’

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:44PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कोल्हापूर शहरातील रस्ते आणि ड्रेनेज यांची स्थिती काही सुधारत नाही, असा अनुभव येत आहे. पंधरा वर्षांपूर्वी शहरात ज्या समस्या होत्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी जो निधी खर्च करण्यात आला त्यानंतर या समस्या दूर होण्याऐवजी त्या अधिकच गंभीर वळण घेताना दिसत आहेत. या सर्व प्रकरणाला नियोजनाचा अभाव तज्ज्ञ अभियंत्यांची कमतरता आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने कोल्हापूरकरांची या त्रासातून मुक्‍तता करण्यासाठी महापालिकेला तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहरातील रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या गुणवत्तेची कसोटी नेहमी पावसाळ्यात लागते. पाऊस सुरू झाला की रस्त्याच्या पृष्ठभागावरील डांबर निघून जाते आणि रस्ते खड्डेमय होतात. ओढ्या-नाल्यातील बांधकामे, पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजनाच्या अभावाने गटारे तुडूंब वाहू लागतात. यामुळे शेजारच्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरते. नागरिकांमध्ये हाहाकार उडतो. मग काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तर काही ठिकाणी नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटण्याचे कार्यक्रमही सुरू होतात. असे प्रकार कोल्हापुरात गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेच्या अर्थसंकल्पातून शेकडो कोटी रुपये खर्ची पडले. राज्य शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा निधी शहरामध्ये आला; पण समस्या काही सुटत नाहीत, असा अनुभव वारंवार येत आहे. यामागील कारणांचा शोध घेत गेले तर शहराला एक दूरगामी नियोजन नसणे हे जसे प्रकर्षाने जाणवते तसे ज्या कामासाठी निधी खर्च केला जातो त्या कामावर असलेली सुमार देखरेखही त्याला जबाबदार असल्याची चर्चा आता अभियंत्यांच्या वर्तुळात सुरू झाली आहे. 

महानगरपालिकेच्या विश्‍वस्तांना टेंडरशिवाय कशातही रस नसतो आणि प्रशासनाला वर्क ऑर्डर देण्याव्यतिरिक्‍त आपली काही जबाबदारी आहे याचेही भान राहत नाही. या गोंधळातून सध्या कोल्हापूरच्या विकासाचे वाटोळे चालले आहे. त्याचा सर्वाधिक त्रास कोल्हापुरकरांना भोगावा लागतो आहे. यावर प्रशासनामध्ये किती गांभीर्य आहे? याचेही विश्‍लेषण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रशासनाच्या गांभीर्याचा अभाव किती आहे? याचे मोजमाप करणारी फूटपट्टी लावायची झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फेरफटका मारण्यास हरकत नाही. शहरात नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरात तर ओढ्या नाल्यात बांधकामे उठली आहेत. तेथे पितळी गणपती पासून नदीकडे जाणारे अनेक ओढ नाले होते. त्यांचे नैसर्गिक मार्ग बंद केले गेले. असे मार्ग बंद करण्यासाठी राजकीय आशीर्वादही लाभले. तसे चिरमिरीही कामाला आली. याचा परिणाम काय झाला तर आज नागाळा पार्कातील वस्त्यांमध्येही घराघरांत पाणी शिरू लागले आहे. पूर्वी कोल्हापुरात शाहूपुरीतील कुंभारवाड्यात गोरगरीबांची वस्ती पाण्याखाली जात होती. तेव्हा सिमेंट काँक्रिटच्या घरातील उच्चभ्रूंना कोरडी हळहळ व्यक्त करण्याचा विषय होता आता ओढ्या नाल्यातील बांधकामाने त्यांचीही घरे पाण्यात जाऊ लागली आहेत. त्याला आयआरबीने राबविलेल्या रस्ते विकास प्रकल्पाने घरांच्या जोत्यापेक्षा रस्त्यांची उंची वाढवून मोठा हातभार लावला आहे. 

नागाळा पार्कातील राजहंस प्रिटींग प्रेसनजीक भाऊसिंगजी रोडवर वस्त्यांवर घुसणारे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने मुख्य रस्ता बंद ठेवून ड्रेनेजचे काम केले. त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च पडला. प्रकल्पादरम्यान दोन माणसांचा बळी गेला आणि आज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही राजहंस प्रिटींग प्रेसच्या मशिनरीला पाण्यात डुंबावे लागते. यावरुन आपण किती नियोजन शून्य आहोत याची कल्पना येऊ शकते. म्हणूनच कोल्हापूर महापालिकेला तज्ज्ञ अभियंत्यांची फळी केव्हा मिळणार? असा प्रश्‍न कळीचा मुद्दा घेऊन उभा राहिला आहे.