होमपेज › Kolhapur › प्राण्यांमध्येही वाढतोय मधुमेहाचा धोका

प्राण्यांमध्येही वाढतोय मधुमेहाचा धोका

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:33PMकोल्हापूर : पूनम देशमुख

वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही सध्या वेगाने मधुमेह वाढत आहे. आता हा मधुमेहाचा धोका प्राण्यांमध्येही वाढत असल्याचे दिसते. प्राण्यांच्या बदलत्या आहाराच्या सवयी, पाळीव प्राण्यांचा कमी झालेला व्यायाम अशा बदलत्या जीवनशैलीमुळे शहरी प्राणी विशेषत: कुत्र्यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. 

मधुमेह, उच्च रक्‍तदाब, कॉलेस्ट्रॉल यासारखे आजार बदलत्या जीवनशैलीमुळे माणसांचे सोबती बनले आहेत. जेवण अथवा झोपेच्या अनियमित वेळा, वाढता ताण, टेन्शन अशा कारणांनी प्रत्येकाच्या घरी मधुमेही आणि उच्च रक्‍तदाबाचे रुग्ण आढळतात. ही बदलती जीवनशैली माणसांप्रमाणे प्राण्यांसाठीही घातक ठरली आहे. माणसाच्या दिनक्रम बदलाचा प्राण्याच्या दिनक्रमावरही परिणाम झाला. शहरातील लहानसे घर, त्यामुळे प्राण्याला फारसा व्यायामाची नसलेली जागा, व्यस्त दिनक्रमामुळे कुटुंबीयांना प्राण्याला फिरवण्यासाठी असलेल्या वेळेची वानवा, परिणामी घटलेेला व्यायाम, मुख्यत्वे प्राण्यांच्या बदललेल्या आहार सवयींमुळे प्राण्यांना मधुमेहाची लागण होत असल्याचे निदान प्राणीतज्ज्ञांकडून केले जाते.

यामध्ये पाळीव प्राण्यांची संख्या अधिक असून मुख्यत्वे कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. लॅर्बोडॉर आणि पॉमेलियन, जर्मन शेफर्ड या प्रजातींच्या कुत्र्यांमध्ये मधुमेहाची लक्षणे सर्वाधिक आढळून येत असल्याचे प्राणीतज्ज्ञ डॉ. अरुण शिंत्रे यांनी सांगितले. अचानक घटणारे वजन, त्याला वारंवार होणारी लघवी, अथवा सातत्याने प्यायले जाणारे पाणी ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष केले गेले तर उपचार सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याचे डॉक्टर्स सांगतात. प्राण्यांना होणार्‍या मधुमेहावर इन्सुलिनचे इंजेक्शन, औषधे तसेच त्यासाठी वेगळा आहार उपलब्ध असतो. त्यामुळे प्राण्यांच्या हालचालींवर, सवयींवर लक्ष देणे आणि सातत्याने त्याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे  डॉक्टर्सनी सांगितले. प्राण्यांच्या प्रकारानुसार तसेच त्यांच्या हालचाली व  वयानुसार आहार मिळावा अन्यथा डायबेटिस सारखे रोग जडतात.

प्राण्यांच्या शरीराला नैसर्गिकरीत्या आवश्यक असणारा व्यायाम शहरातील भिंतीमध्ये मिळत नाही. पॅकबंद आहार दिला जातो. मात्र, प्रत्येक प्राण्याचे वजन आणि त्याची शारीरिक रचना यानुसार आहार वेगळा असतो, त्याला  फिरवायला नेण्यास टाळाटाळ होते, कोणत्याही बाबीचा विचार न करता आहार दिल्याने प्राण्यातील कॅलरीज वाढून त्यांना मधुमेह होतो. याकडे गांभीर्याने लक्ष देत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्राण्यांना आहार द्यावा,  वेळोवेळी आवश्यक तपासणी करून घेणे गरजेचे आहे  - डॉ. अरुण शिंत्रे, प्राणीतज्ज्ञ