Tue, Jul 07, 2020 11:27होमपेज › Kolhapur › ऐतिहासिक वारसा जपणे स्थानिकांची जबाबदारी 

ऐतिहासिक वारसा जपणे स्थानिकांची जबाबदारी 

Published On: Sep 29 2018 1:39AM | Last Updated: Sep 28 2018 10:28PMकोल्हापूर : सागर यादव 

एखाद्या गावची संस्कृती-परंपरा-पूर्वजांचा स्फूर्तिदायी इतिहास सांगायला बाहेरील लोकांनी येणे कितपत योग्य आहे? वास्तविक हा ऐतिहासिक वारसा जपण्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिकांचीच आहे. बाहेरील लोकांकडून याची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा कशासाठी? असा सवाल इतिहासप्रेमींतून व्यक्त होत आहे. 

शहरापासून अवघ्या 15 कि. मी. अंतरावर असणार्‍या कसबा बीड (ता. करवीर) या गावात तेथील ऐतिहासिक वैशिष्ट्य असणार्‍या ‘वीरगळ’ जतनाची मोहीम कोल्हापुरातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी हाती घेतली; ही गोष्ट खरोखरच अनुकरणीय आहे. पण मग स्थानिक युवक काय करतात? त्यांना आपल्या पूर्वजांबद्दल काहीच वाटत नाही का? 

शहरी संस्कृतीचे अंधानुकरण करणार्‍या इतर ग्रामीण भागातील युवकांप्रमाणेच कसबा बीड या गावचे तरुणही मूळ कृषिसंस्कृती-परंपरेऐवजी अनावश्यक गोष्टींचा भरणा असणार्‍या सण-उत्सव-समारंभ आणि ‘डे’ मध्ये व्यस्त झाले आहेत. वास्तविक तरुणांच्या शक्तीचा विधायक आणि सामाजिक कार्यासाठी वापर होणे काळाची गरज आहे.   जगभर कोठेही नसेल असा ऐतिहासक वारसा कोल्हापुरातील प्रत्येक गावांना लाभला आहे. त्याच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्न होणे काळाची गरज आहे. 

स्थानिकांच्या पाठबळाची गरज...
स्थानिक लोक हा वारसा जपण्यास उदासीन असल्याचे वास्तव आहे. बाहेरील लोकांकडून प्राथमिकता घेण्याऐवजी त्यांनीच पुढे होऊन हा वारसा जपणे गरजेचे आहे. मात्र तसे दिसत नाही. महादेव मंहदिराभोवती संरक्षक कठडा बांधताना अनेक वीरगळींची मोडतोड झाली. अनेक वीरगळ व मूर्ती कुठल्यातरी मठाकडे पाठविण्यात आल्याचे समजते. आजही अनेक मूर्ती गावभर आपल्या अंतिम घटका मोजत पडल्या आहेत. स्थानिक युवकांनी नको त्या गोष्टीत आपला वेळ-श्रम आणि पैसा वाया घालविण्यापेक्षा राष्ट्राची संपत्ती असणार्‍या या गोष्टींसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन इतिहासप्रेमींकडून होत आहे.  

 शिवशक्ती प्रतिष्ठानचे प्रयत्न...
शिवशक्ती प्रतिष्ठानने वीरगळ संवर्धन मोहिमेचा टप्पा नुकताच पूर्ण केला. वीरगळ अभ्यासक अनिल दुधाणे यांंच्या मार्गदर्शनाखाली गावभर विखुरलेले 30 ते 35 दगडी वीरगळ व सतिशिळा महादेव मंदिरात एकत्रित ठेवण्यात आले. मोहिमेत अध्यक्ष साताप्पा कडव, करवीर पं. स. सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच सत्यजित पाटील, बबन गावडे, मच्छींद्र चौगले, भीमराव पानारी, विजय काताळे, नीलेश खोले, रवी जाधव, उत्तम वरुटे, हृषीकेश शिंगे, भगवान खाडे आदींनी सहभाग घेतला. 

राष्ट्राची संपत्ती असणारा वारसा...
कसबा बीड हे गाव इसवी सन 12 व्या शतकातील गंडरादित्य भोज राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. यामुळे येथे अनेक मंदिरे, शिल्पाकृती सर्वत्र विखुरलेल्या आहेत. सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशी ख्याती असणार्‍या या गावात आजही सोन्याची नाणी सापडतात. या सर्व गोष्टींना राष्ट्राच्या संपत्तीचा दर्जा आहे. यामुळे त्याचे संरक्षण व्हावे, असे वाटणार्‍या व्यक्तींकडून याकरिता सातत्याने विविध प्रयत्न केले जातात.