Wed, May 12, 2021 00:20होमपेज › Kolhapur › मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या वतीने माजी पोलिस महासंचालक आणि भारत सरकारच्या पोलिस संशोधन व विकास विभागाच्या अध्यक्षा मीरा बोरवणकर-चढ्ढा यांच्या विशेष मुलाखतीवेळी त्यांच्या ‘माझ्या आयुष्याची पानं’ पुस्तकाचे प्रकाशन दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजता हॉटेल सयाजीमधील मेघ-मल्हार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 

महिला जगतात वेगळ्या वाटेने चालणार्‍या; पण सामाजिक बांधिलकीचे भान जपणार्‍या महिलांचे अनुभव ऐकण्याची संधी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबने कोल्हापुरातील महिलांना उपलब्ध करून दिली आहे. त्यात बोरवणकर-चढ्ढा यांची मुलाखत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील घेणार आहेत. याच कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांचीही मुलाखत सादर होणार आहे. दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.10) सायंकाळी पाच वाजता राज्याच्या ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत आमदार प्रणिती शिंदे  घेणार आहेत. हा कार्यक्रमही हॉटेल सयाजीमध्येच होणार आहे. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम फक्‍त महिलांसाठी आहेत.  

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेद्वारे आयपीएस  झाल्यानंतर मीरा बोरवणकर-चढ्ढा यांना महाराष्ट्र केडर मिळाले. त्याचवेळी त्यांची सर्वप्रथम कोल्हापूर पोलिस दलात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्‍ती झाली. त्यांच्या पोलिस दलातील कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरातूनच झाल्याने त्यांना कोल्हापूरबाबत विशेष आकर्षण आणि आस्था आहे. पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक, विविध शहरांचे पोलिस आयुक्‍तपद भूषविल्यानंतर त्या पोलिस महासंचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्या. सेवाकाळात त्यांनी अनेक जिल्हे, शहरे आणि महत्त्वाच्या पदांवर काम केले असले तरी कोल्हापूरबाबत असलेला जिव्हाळा त्यांचा कधीच कमी झाला नाही.

सेवानिवृत्तीनंतर भारत सरकारने त्यांच्यावर पोलिस संशोधन व विकास विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. ही जबाबदारी पेलत असतानाच त्यांनी आपल्या सेवा काळातील काही उल्लेखनीय आठवणींना ‘माझ्या आयुष्याची पानं’ या पुस्तकाच्या रूपाने उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या पोलिस दलात महिला अधिकारी म्हणून वेगळा ठसा उमटविणार्‍या मीरा बोरवणकर-चढ्ढा यांच्या संपूर्ण सेवाकाळ आणि जीवन कार्याची माहिती या पुस्तक रूपाने चिरंतर राहणार आहे. त्याच पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापुरातच दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते होत आहे.