Sat, Aug 08, 2020 03:18होमपेज › Kolhapur › चित्रपटांतून समाजाची प्रगल्भता वाढते

चित्रपटांतून समाजाची प्रगल्भता वाढते

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कलेच्या विकासासाठी खुल्या वातावरणाची गरज आहे. असे खुले वातावरण समाजाची प्रगल्भता वाढवते, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी  केले. येथील शाहू स्मारक भवनमध्ये सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते झाले. घई यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर पुरस्काराने भावे यांना गौरवण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

शब्दांच्या पलीकडे जाऊन चित्रपटांची भाषा प्रेक्षकांना समजते, असे सांगून भावे म्हणाल्या, मी प्रथम लघुपट बनवले. त्यामधून विशेषत: स्त्रीयांचे प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न केला. त्या महिलांना लघुपट किती आवडला हे सांगत नव्हत्या; पण माझी कथा तुला कशी समजली, असे त्या विचारत होत्या. यातून त्यांना हे माध्यम अधिक प्रमाणात भावते हे समजले. यातूनच नंतर चित्रपटांकडे वळले.  महिला म्हणून नाही; पण माणूस म्हणून त्यांना भिडणारे प्रश्‍न मांडत गेले.  चित्रपट माध्यम हे सर्वात महत्त्वाचे  व सर्वांना पाहावे असे वाटणारे माध्यम आहे. आज डिजिटल तंत्रज्ञानाचा चित्रपटांवर परिणाम होत असून, हे तंत्रज्ञान डोक्यात जाऊन आपली मने बिघडवणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. कलेचा विकास हा खुल्या वातावरणात होऊ शकतो, तसे पोषक वातावरण तयार करण्याचे काम शासनाने करावे.

दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपट माध्यमाचे शिक्षण घेतले. कोल्हापूरचे राम गबाले हे माझे शिक्षक होते. मराठी चित्रपटसृष्टीला शतक महोत्सवानिमित्त कोल्हापुरात हा महोत्सव होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.  कोल्हापुरात चित्रपट निर्मिती होऊन तो या निमित्ताने आंतराराष्ट्रीय स्तरावर पोहचावा. परदेशात जे चित्रपट महोत्सव भरतात, त्याचे आयोजन कलाप्रेमी जनता करते. तेथील शासनाची भूमिका फारशी नसते. आपल्या देशात पूर्वी चित्रपटांना राजाश्रय होता; पण आता  चित्रपट महोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकांचा अशा महोत्सवातून सहभाग वाढणे गरजेचे आहे. अशा महोत्सवातूनच चित्रपट माध्यम अधिक पद्धतीने समजू शकते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, महोत्सवातून चित्रपटविषयक जागृती होऊन चित्रपटांचे रसग्रहण कसे करावे याचे आकलन होते. या महोत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. प्रास्ताविक चंद्रकांत जोशी यांनी केले. मानपत्र वाचन दिलीप बापट यांनी केले. यावेळी विजयमाला मेस्त्री, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.