होमपेज › Kolhapur › विकास डिगेंचे पोस्टर पंतप्रधानांनाही भावले

विकास डिगेंचे पोस्टर पंतप्रधानांनाही भावले

Last Updated: Mar 26 2020 12:03AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कलाकारांच्या कार्यकर्तृत्वाने बहरलेल्या कलेच्या माहेरघराचे नाव पुन्हा एकदा देशभरात झळकले आहे. जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर या निर्णयाच्या समर्थनात कोरोना विषाणू संदर्भातील ‘कोई भी रोड पे ना आये’, 22 मार्च रविवार, घरी असेल आपला परिवार’ असे सूचक अन् तितकेच प्रभावी डिझाईन बनवले होते. दोन दिवस त्या डिझाईनवर काम केल्यानंतर जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी मध्यरात्री त्यांनी त्यांच्या फेसबुकवरून शेअर केले होते. 

ही प्रभावी क्रिएटिव्हिटी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भावली. त्यांनी देशाला संबोधित करताना विकास डिगे या कोल्हापूरच्या कलाकार सुपुत्राची क्रिएटिव्हिटी संपूर्ण देशाला दाखवली. त्यामध्ये पंतप्रधानांनी समाज माध्यमातून अशा प्रकारे जागृती करणार्‍यांचा विशेष उल्लेख करत त्यांचे आभार व्यक्त केले. विकास डिगे याची लक्ष्मीपुरी परिसरामध्ये अ‍ॅड.टूमॉरो अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी आहे.

मंगळवारी (दि. 24) रात्री  पंतप्रधान मोदींनी कोरोनाबाबत जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी कोरोनासंदर्भातील पोस्टर सर्व देशवासीयांना दाखवले. जे त्यांनाही मनापासून भावले. विकास डिगे यांनी तयार केलेले पोस्टर पंतप्रधानांच्या हातात आहे, ही बातमीही त्यांना मित्रांकडून फोनवरून समजली. त्यानंतर त्यांना एक क्षण त्यावर विश्‍वासच बसत नव्हता. हळूहळू त्यांच्या मित्रांचे फोन  खणखणू लागले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना याबाबत काही संदेश आलेला नाही; मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद मात्र त्यांना आहे. 

गेली 7 वर्षे आर्टिस्ट म्हणून काम करणारे विकास एका फिल्म प्रॉडक्शन हाऊससाठीही काम करत आहेत. गतवर्षी ‘मामी’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचा सहभाग असलेली फिल्म ‘इमेगो’ ही नामवंतांनी नावाजली होती. याशिवाय शासन जाहिरात निविदांमध्ये स्टार्ट अप इंडिया या श्रेणीतील यादीमध्ये त्यांचे नाव 14 व्या क्रमांकावर झळकले आहे. एका नामांकित मोबाईल कंपनीचे 5 जिल्ह्यांतील जाहिरातीचे कामही विकास पाहतात. त्यांच्या या यशामुळे कलानगरीचे नाव आणखीन उजळले आहे. 

कोल्हापूरच्या सुपुत्राचा गौरव

देशाच्या पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या सुपुत्राचा गौरव करण्याची दुसरी वेळ आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या लोगोसाठी देशभरातून आवाहन करण्यात आले होते. लाखो कलाकारांनी लोगो पाठवले; पण कोल्हापूरच्या निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझर्सचे अनंत खासबारदार यांच्या लोगोची निवड करण्यात आली. गांधी चष्मा आणि त्यातील एका भिंगात स्वच्छ व दुसर्‍या भिंगात भारत अशी अक्षरे होती. देशभरात स्वच्छ भारत संकल्पना शब्दाबरोबर  हा लोगो वापरला जातो. नव्याने विकासच्या पोस्टरचाही समावेश करण्यात आल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.